नवी दिल्ली/कोलकाता :कथित आर्थिक अनियमिततेच्या चौकशीसंदर्भात केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी आर. जी. कर वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष, माजी वैद्याकीय अधीक्षक सह उपप्राचार्य संजय वशिष्ठ आणि इतर १३ जणांच्या मालमत्तांची झडती घेतली. तसेच रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी आणि त्यांना आवश्यक साहित्य पुरवण्यात गुंतलेल्या व्यक्तींची निवासस्थाने आणि कार्यालयांची झाडाझडतीही अधिकाऱ्यांनी घेतली.

हेही वाचा >>> Kangana Ranaut : “शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या”; कंगना रनौत यांचं विधान चर्चेत!

‘सीबीआय’चे किमान सात अधिकारी सकाळी आठ वाजल्यापासून घोष यांची त्यांच्या बेलियाघाटा येथील निवासस्थानी चौकशी करत होते. हे तपास पथक सकाळी सहाच्या सुमारास घोष यांच्या निवासस्थानी पोहोचले. परंतु त्यांना जवळपास दीड तास ताटकळत रहावे लागले. वशिष्ठ यांना वैद्याकीय अधीक्षक सह उपप्राचार्य असताना रुग्णालयात झालेल्या आर्थिक अनियमिततेबद्दल किती माहिती होती, असा प्रश्न या वेळी विचारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पथकातील काही जणांनी संजय वशिष्ठ आणि औषध विभागाचे आणखी एका प्राध्यापकाची चौकशी केली. ‘सीबीआय’चे इतर अधिकारी हावडा येथील एका वस्तू पुरवठादाराच्या घरी चौकशीसाठी गेले. तसेच अन्य पथकाने रुग्णालयाचे माजी प्राचार्य यांच्या कार्यालयाची झडती घेतल्यानंतर महाविद्यालयाच्या उपाहारगृहात त्यांनी आपला मोर्चा वळवला.

मुख्य आरोपीची प्रेसिडेन्सी तुरुंगात लाय डिटेक्शन चाचणी

नवी दिल्ली : डॉक्टर बलात्कार आणि हत्येतील मुख्य आरोपी संजय रॉयची (३३) ‘लाय डिटेक्शन टेस्ट’ प्रेसिडेन्सी कारागृहात सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. रॉय आणि संदिप घोष यांच्यासह सात जणांची ‘लाय डिटेक्शन टेस्ट’ करण्यासाठी ‘सीबीआय’ने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ही चाचणी पुरावा म्हणून वापरली जाणार नाही, परंतु त्यातील निष्कर्ष तपास यंत्रणेला पुढील तपासासाठी दिशादर्शक ठरणार आहे.