बंगळूरु : शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला आणि परदेशात पळून गेलेला हसनचा जेडीएसचा खासदार प्रज्ज्वल रेवण्णा याच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ बजावण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना शनिवारी यासंबंधी माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात देण्यात आलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या यांनी शनिवारी ‘एसआयटी’ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती, प्रज्ज्वल रेवण्णाला अटक करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यावेळी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, ‘‘आम्ही योग्य उपाययोजनांसह अटकेची कार्यवाही करू. सीबीआय ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ बजावण्याची शक्यता आहे, त्यामुळे तपासाला वेग येईल’’. प्रज्ज्वल रेवण्णाविरोधात लूकआऊट नोटीस यापूर्वीच जारी करण्यात आली आहे. विमानतळांकडून माहिती मिळाल्यावर तातडीने आरोपीला अटक करून परत आणले जाईल, असे अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

एखाद्या गुन्ह्याच्या संबंधात व्यक्तीची ओळख, ठिकाण किंवा कृती यांच्याविषयी सदस्य देशांकडून अतिरिक्त माहिती संकलित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य संस्थेकडून ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ बजावण्यात येते. अधिकृत सूत्रांनी माहिती दिली की, ‘एसआयटी’ने प्रज्ज्वल रेवण्णाविरोधात ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ बजावण्यासाठी सीबीआयला विनंती केली आहे. सीबीआयने नोटीस बजावल्यानंतर ‘एसआयटी’ला प्रज्ज्वलच्या ठावठिकाण्याची माहिती मिळेल असे संबंधित अधिकारी म्हणाले.

हेही वाचा >>> बंगालच्या बदनामीचे कारस्थान! संदेशखाली प्रकरणी तृणमूलचा भाजपवर आरोप

शहा यांच्याकडून अभय

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून प्रज्ज्वल रेवण्णाने लैंगिक अत्याचार केलेल्या महिलांना शक्य ती सर्व मदत देऊ करावी अशी विनंती केली आहे. राहुल यांनी या पत्रामध्ये प्रज्ज्वल रेवण्णाच्या कृत्यांचा निषेध केला असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून अभय असल्याचा आरोप केला आहे. या महिला न्यायासाठी लढा देत असताना त्यांना करुणा मिळणे आवश्यक आहे. या भयंकर गुन्ह्यांसाठी जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा होईल याची खबरदारी घेणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi likely to issue blue corner notice against prajwal revanna in sex scandal case zws
Show comments