कुटुंबीयांचे सांत्वन, प. बंगाल सरकारकडे अहवालाची मागणी

वृत्तसंस्था, कोलकत्ता : उत्तर कोलकत्त्याच्या घोष बागान या भागात शुक्रवारी सकाळी एका रिकाम्या इमारतीत २६ वर्षीय भाजप कार्यकर्त्यांचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला. भाजपच्या युवा शाखेचा कार्यकर्ता असलेल्या मृत अर्जुन चौरसियाच्या संशयास्पद मृत्यूचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे (सीबीआय) व्हावा, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केली. याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारने अहवाल देण्याची सूचनाही त्यांनी केली. मृत कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे शहा यांनी सांत्वन केले.

शहा म्हणाले, की ममता बॅनर्जी सरकारने कालच वर्ष पूर्ण केले. ‘आम्ही अशा कारवाया थांबवणार नाही,’ असा संदेशच जणू त्यांना द्यायचा असावा. मी मृत कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांशी सविस्तर संवाद साधला. आपला मुलगा त्यांनी तर गमावलाच, पण त्याचा मृतदेहही त्यांना डावलून ज्याप्रकारे हिरावून नेण्यात आला, त्यामुळे ते शोकसंतप्त आहेत. याप्रकरणी आमचा पक्ष न्यायालयात जाणार आहे. यातील दोषींना त्वरित ताब्यात घेतले जावे व या प्रकरणाची ‘सीबीआय’तर्फे चौकशी व्हावी. आरोपींना पकडण्याऐवजी पोलीस, प्रशासनाने बळजबरीने मृतदेह नेला, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. अर्जुन आपल्या मोठय़ा भावासह एका अंतर्वस्त्राच्या कारखान्यात काम करत होता. आपल्या मुलाने आत्महत्या केली नसून, त्याच्या हत्येची ‘सीबीआय’ चौकशी व्हावी, अशी मागणी अर्जुनची आई लक्ष्मी चौरसिया हिने केली आहे.

‘भाजपकडून राजकीय रंग’

भाजप या प्रकरणाला राजकीय वळण देत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला. या पक्षाचे खासदार शंतनू सेन यांनी सांगितले, की कुठलाही मृत्यू हा दुर्दैवीच असतो. हे उत्तर प्रदेश नसून, बंगाल आहे. येथे पोलीस यंत्रणा आहे. कुठल्याही गुन्ह्याची, घटनेची येथे नि:पक्षपाती चौकशी केली जाते. राजकीय हितसंबंधांची बाधा त्यात येत नाही. याआधीही अशा प्रकरणांत तो खून असल्याचे भासवण्यात आले आहे. याप्रकरणी संपूर्ण तपास झाल्याशिवाय मला यावर प्रतिक्रिया द्यायची नाही, असेही सेन यांनी नमूद केले.