इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी सीबीआयने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी अमित शहा यांची कसून चौकशी केली. बनावट चकमकीच्या कालावधीत गुजरात सरकारचे प्रत्येक पोलीस ठाण्यावर बारीक लक्ष होते, असा आरोप या प्रकरणात आरोपी असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने केल्यानंतर शहा यांची चौकशी करण्यात आली.
अमित शहा हे २००४ मध्ये राज्याचे गृहमंत्री होते. या प्रकरणातील आरोपी म्हणून सध्या कारागृहात असलेले आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांनी आपल्या राजीनामापत्रात नमूद केले होते की, गुजरात सरकार प्रत्येक पोलीस ठाण्याला प्रेरणा, मार्गदर्शन करून त्यावर बारकाईने लक्ष ठेवून होते. त्यामुळेच शहा यांची चौकशी करण्यात आली. मात्र संपर्क साधला असता सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यात आल्याच्या माहितीला दुजोरा देण्यास नकार दिला.
चकमकींच्या विविध प्रकरणांत आरोपी असलेले पोलीस अधिकारी दहशतवादाबाबत केवळ गुजरात सरकारच्या धोरणांचे पालन करीत होते, अशी भूमिका वंजारा यांनी आपल्या राजीनामापत्रात घेतली होती, तीच त्यांनी सीबीआय चौकशीच्या वेळी कायम ठेवली, असे सूत्रांनी सांगितले.
अमित शहा यांना सोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम प्रजापती चकमक प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र सध्या ते जामिनावर बाहेर असून त्यांच्यावर उत्तर प्रदेश भाजपची जबाबदारी आहे.