इशरत जहाँ चकमकप्रकरणी सीबीआयकडून सुरू असलेली चौकशी आता केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जिवाला लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून धोका असल्याची माहिती नेमकी कोणत्या माध्यमातून प्रसृत करण्यात आली, याबाबत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या एका अधिकाऱ्याची नुकतीच चौकशी केली. सीबीआयने या अधिकाऱ्याचे नाव उघड केले नसले तरी तो १९७९च्या तुकडीचा पोलीस अधिकारी असून सध्या तपास यंत्रणेत विशेष संचालकाच्या दर्जाचे पत तो भूषवीत असल्याचे समजते.
भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया तसेच नरेंद्र मोदी यांच्या जिवाला लष्कर-ए-तोयबाकडून धोका असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुजरात पोलिसांनी इशरत जहाँ व तिच्या साथीदारांना पोलिसांकडून चकमकीत ठार झालेल्या इशरत जहाँ आणि तिच्या तीन साथीदारांना १५ जून २००४ या दिवशी गुजरातमध्ये ठार केले होते. या चकमकीतील सत्य-असत्यता पडताळून पाहावी, असा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने सीबीआयला दिला असून त्यानुसार ही चौकशी सुरू आहे.
मोदी तसेच अन्य नेत्यांच्या जिवाला दहशतवाद्यांकडून धोका असल्याची तुम्हाला मिळालेली माहिती खरी होती का, असा प्रश्न विचारला असता तपास यंत्रणेच्या या अधिकाऱ्याने होकारार्थी उत्तर दिले. गुजरातमध्ये २००२मध्ये झालेल्या धार्मिक दंगलीनंतर मोदी यांच्या जिवाला दहशतवाद्यांकडून व विशेषत लष्कर-ए-तोयबाकडून धोका आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली होती आणि त्यात तथ्यही होते, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा