बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयची कारवाई
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी हिमाचलप्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या ११ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. त्यांच्यावरील कारवाईचा काँग्रेसने अमानुष व सूडात्मक अशा शब्दांत निषेध केला आहे. दिल्ली, सिमला व इतर ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. दिल्लीतील निवासस्थान, दक्षिण दिल्लीत मेहरौलीचे फार्म हाऊस, सिमला व रामपूरची दोन घरे येथे हे छापे टाकण्यात आले. अधिकृत निवासस्थानातून ते सकाळी साडेसात वाजता संकटमोचन मंदिरात जाण्यासाठी बाहेर पडले तेव्हा वीरभद्र यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. त्यांच्या दुसऱ्या मुलीच्या विवाहाची लगबग सुरू असताना वरासह ते मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. नेमकी हीच वेळ साधून सीबीआय म्हणजे गुन्हे अन्वेषण शाखेने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात त्यांच्यावर छापे टाकले. ते संयुक्त पुरोगामी आघाडीच्या मंत्रिमंडळात पोलाद मंत्री होते त्यावेळी त्यांनी ६.१ कोटीची बेहिशेबी मालमत्ता जमवली आहे. प्राथमिक चौकशीत त्यांची पत्नी प्रतिभा सिंह, मुलगा विक्रमादित्य सिंग व कन्या अपराजिता सिंह तसेच एलआयसी एजंट आनंद चौहान यांची नावे आहेत. आता सीबीआयने न्यायालयात प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
वीरभद्र सिंह हे २००९-११ या काळात पोलाद मंत्री होते त्यावेळी त्यांनी ज्ञात स्रोतापेक्षा जास्त संपत्ती मिळवली. सिंह यांनी ६.१ कोटी रुपये विमा पॉलिसीच गुंतवले. त्यात एलआयसी एजंट चौहान यांनी मदत केली होती. ही कारवाई सूडाची असल्याचे काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले असून नरेंद्र मोदी यांचा काँग्रेस व त्या पक्षाच्या नेत्यांविरोधातील द्वेषमूलक राजकीय सूड आता टिपेला पोहोचला आहे, त्यामुळेच त्यांनी वरिष्ठ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी छापे टाकले. अत्यंत खालच्या दर्जाचे हे राजकारण असून एका बाजूला घरात लग्नाचे पाहुणे, वर दर्शनासाठी मंदिरात जात असताना दुसरीकडे सीबीआयचे धाडसत्र सुरू होते. यातूनच मोदी सरकारचा व्यक्तीगत द्वेष कुठल्या टोकाला गेला आहे हे दिसून येते. मोदी ज्या पद्धतीने सूड उगवित आहेत ती पद्धत भारतीय संस्कृतीला नवीन आहे व मुलीचे लग्न उधळण्याची परंपरा आपल्याकडे नक्कीच नाही. पण मोदींची ती व्यक्तीगत द्वेषमूलक शैली आहे असा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आझाद यांनी केला. सीबीआयचे १८ सदस्यांचे पथक सिंह यांच्या निवावस्थानी पाच वाहनांतून सिंह व त्यांचे कुटुंबीय त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी बाहेर पडल्यानंतर आले. मुख्यमंत्री व त्यांचे कुटुंबीय साधेपणाने विवाह उरकून सकाळी अकरावा वाजता परत आले त्यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उभे होते. पण वीरभद्र सिंह यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. भाजप नेते सुरेश भारद्वाज व पक्ष प्रवक्ते गणेश दत्त यांनी वीरभद्र यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेस सरकार खिळखिळे करण्यासाठी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार दबावतंत्र वापरत आहे असा आरोप हिमाचलप्रदेश मंत्रिमंडळाने काढलेल्या निवेदनात कालच केला आहे.