शीना बोरा हत्या प्रकरणात माजी माध्यम सम्राट पीटर मुखर्जी व त्यांची पत्नी इंद्राणी यांच्या पाच शहरांतील एकूण नऊ ठिकाणांवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने छापे टाकले आहेत.

सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले, की आमच्या पथकांकडून पीटर व इंद्राणी यांच्या मुंबई गोवा येथील प्रत्येकी दोन निवासस्थानी छापे टाकण्यात आले. इंद्राणी यांच्या गुवाहाटी येथील वडिलोपार्जित घरावर छापा टाकण्यात आला, तिचा वाहनचालक श्यामवर पिंटुराम राय याच्या मुंबई व मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील निवासस्थानी तसेच संजीव खन्ना यांच्या कोलकाता येथील निवासस्थानी छापे टाकण्यात आले. पंचवीस वर्षांची शीना ही इंद्राणी यांची पहिल्या विवाहातून झालेली कन्या होती. तिचा २४ एप्रिल २०१२ रोजी खून झाला होता व तिचा मृतदेह जाळून रायगड जिल्हय़ातील जंगलात त्याची विल्हेवाट लावण्यात आली होती.

सीबीआयने भादंवि कलमानुसार गुन्हेगारी कट, खून, अपहरण, पुरावा नष्ट करणे, विष देऊन मारण्याचा प्रयत्न करणे हे आरोप त्यांच्यावर केले आहेत. इंद्राणी, खन्ना व राय यांनी शीनाच्या हत्येचा गुन्हेगारी कट आखल्यानंतर सुरुवातीची चौकशी मुंबई पोलिसांनी केली. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले. आरोपीने शीनाचे अपहरण करून खून केला व नंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. मुंबईचे माजी पोलीस प्रमुख राकेश मारिया यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी काढून घेतली गेली व नंतर पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी सादर केलेल्या अहवालानुसार सीबीआयकडे देण्यात आले. हे प्रकरण केवळ खुनापुरते मर्यादित नसून आर्थिक गैरव्यवहारांशी संबंध आहे, असे नमूद करण्यात आल्याने तपास सीबीआयकडे दिला गेला.

Story img Loader