बिहारमध्ये बहुमत चाचणीआधी सीबीआयने राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांवर कारवाई केली असल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित नोकरी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने नेत्यांच्या घरावर छापेमारी केली आहे. अशफाक करीम आण सुनील सिंग यांच्या घरांसह अनेक ठिकाणी सीबीआयने छापे टाकले असून तपास सुरु आहे.
सुनील सिंग यांनी जाणीवपूर्वक ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. “जाणीवपूर्वक ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईला काही अर्थ नाही. आम्हाला घाबरवलं, तर आमदार त्यांच्या बाजूने मतदान करतील असं त्यांना वाट आहे,” अशी प्रतिक्रिया सुनील सिंग यांनी दिली आहे.
छापेमारीवर बोलताना खासदार मनोज झा यांनी सांगितलं की, “ईडी, प्राप्तिकर विभाग किंवा सीबीआयने नाही तर भाजपाने हा छापा टाकला आहे. ते भाजपाच्या अंतर्गत काम करतात. भाजपाच्या स्क्रिप्टवरच या कार्यालयांचं कामकाज सुरु आहे. आज बहुमत चाचणी आहे आणि आता काय सुरु आहे? आता याचा पूर्ण अंदाज आला आहे”.