अतिउंच प्रदेशात सैन्याला लागणारे तयार तंबू खरेदी करण्यातील कथित घोटाळ्याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) फसवणुकीचा तसेच भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. ज्या कंपनीने हे तंबू पुरवले ती ‘साईबाबा बिल्डर्स अँड कन्सल्टंट’ ही कंपनी, कंपनीचे तीन संचालक तसेच सैन्याच्या ज्या तुकडीसाठी हे तंबू मागवण्यात आले होते त्या ‘स्पेशल फ्रंटियर फोर्स’चे अज्ञात अधिकारी आणि मंत्रिमंडळ सचिवालयातील अज्ञात अधिकारी यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिमालयातील अतिउंच प्रदेशात सैनिकांना राहण्यासाठी आवश्यक असणारे तंबू पुरवण्याच्या कंत्राटात काही गैरप्रकार झाल्याच्या संशयावरून पंतप्रधान कार्यालयाने चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. २२ कोटी रुपयांच्या या कंत्राटात कंपनीला गैरवाजवी सहकार्य देण्यात आल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. विशेष म्हणजे या कंपनीच्या श्यामसुंदर भट्टर, जेपीएन सिंग आणि मंजरी या तीन संचालकांपैकी मंजरी ही महिला परराष्ट्र राज्यमंत्री व माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांचे निकटवर्तीय एस. पी. सिंग यांची पत्नी आहे.
स्पेशल फ्रंटियर फोर्स हे पथक ‘रीसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग’ (रॉ) या गुप्तचर संस्थेच्या अखत्यारीतील लढाऊ पथक आहे. या पथकासाठी २००९ ते २०१३ या कालावधीत तंबू खरेदी करताना रॉ तसेच मंत्रिमंडळ सचिवालयातील काही अधिकाऱ्यांनी कंपनीला अवाजवी झुकते माप दिल्याचा आरोप आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा