इशरत जहॉं कथित चकमकप्रकरणी सीबीआय पहिल्या आरोपपत्रामध्ये गुप्तवार्ता विभागाचे विशेष संचालक राजेंद्र कुमार यांचे नाव घालणार नाही. येत्या ४ जुलैला या प्रकरणातील पहिले आरोपपत्र उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.
या कथित चकमकप्रकरणात हात असल्याच्या आरोपामुळे राजेंद्र कुमार यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी सीबीआय केंद्रीय गृह मंत्रालयाकडे करणार नसल्याचे याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे. राजेंद्र कुमार येत्या ३१ जुलैला निवृत्त होत आहेत. त्यानंतरच त्यांना अटक करण्यात येईल आणि त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येईल. पंधरा दिवसांपूर्वी सीबीआयच्या अधिकाऱयांनी राजेंद्र कुमार यांची दिल्लीमध्ये चौकशी केली होती. हे हत्याकांड घडवून आणण्यात राजेंद्र कुमार यांची भूमिका काय होती, याची माहिती जमविण्यासाठी त्यांची चौकशी करण्यात आली.
इशरत जहॉं हिची कथित चकमकीत हत्या करण्यापूर्वी ज्या अधिकाऱयांनी तिला बेकायदा ताब्यात घेऊन तिची चौकशी केली होती. त्यामध्ये राजेंद्र कुमार हेदेखील होते. याचे पुरेसे पुरावे सीबीआयकडे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱया सीबीआयच्या अधिकाऱयांना अधिक सुरक्षा पुरवावी, अशी मागणी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडे करण्यात आली असल्याचे सीबीआयने सांगितले.
इशरत जहॉं चकमक: ‘सीबीआय तपास अधिकाऱयांना अधिक सुरक्षा द्या’
इशरत जहॉं कथित चकमकप्रकरणी सीबीआय पहिल्या आरोपपत्रामध्ये गुप्तवार्ता विभागाचे विशेष संचालक राजेंद्र कुमार यांचे नाव घालणार नाही.
First published on: 01-07-2013 at 12:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi seeks more security for officer probing ishrat jahan encounter case