नवी दिल्ली : ‘नीट-यूजी’ परीक्षेतील कथित गैरप्रकारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपास सुरू केला आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून विविध राज्यांमधील पोलिसांनी नोंदवलेले गुन्हेदेखील आपल्या कक्षेत आणण्यासाठी पावले उचलत असल्याचेही सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘नीट-यूजी’ प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला जाईल असे केंद्र सरकारने शनिवारी जाहीर केल्यानंतर रविवारी सीबीआयने कामाला सुरुवात केली. ‘नीट-यूजी’ परीक्षा ५ मे रोजी देशभरातील ४,७५० केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती आणि जवळपास २४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल नियोजित वेळेच्या १० दिवस आधी, ४ जूनलाच जाहीर झाला होता. निकालात अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप असून विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

शिक्षण यंत्रणा माफियांच्या ताब्यात!

दरम्यान, ‘नीट-यूजी’ परीक्षेसह अन्य स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटण्याच्या प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांची असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (एनटीए) ही वरकरणी स्वायत्त संस्था असल्याचे दाखवले गेले. प्रत्यक्षात ते भाजप आणि संघाचे कपटी हितसंबंध सांभाळत होते असे खरगे म्हणाले.

हेही वाचा >>> “नेते निवडताना चुकलं की..”, NEET वरुन प्रकाश राज यांचा टोला, मोदींचं व्यंगचित्र पोस्ट करत उडवली खिल्ली

फेरपरीक्षेला निम्मेच विद्यार्थी

नीट-यूजी परीक्षेमध्ये वाढीव गुण देण्यात आलेल्यांची फेरपरीक्षा रविवारी घेण्यात आली. यातील १ हजार ५६३ विद्यार्थ्यांपैकी ८१३ जणांनीच ही परीक्षा दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सात केंद्रांवर ही फेरपरीक्षा झाली. उर्वरित विद्यार्थ्यांना ५ मे रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेतील मूळ गुणांसह (वाढीव गुण वगळून) प्रमाणपत्र दिले जाईल, असे राष्ट्रीय चाचणी संस्थेने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.

भाजपच्या कारभारात संपूर्ण शिक्षण यंत्रणा माफिया आणि भ्रष्ट लोकांकडे सोपवण्यात आली आहे. राजकीय दुराग्रह आणि लोभी आणि खुशामतखोर अक्षम लोकांकडे शिक्षण व्यवस्था आणि मुलांचे भविष्य सोपवण्याचा अहंकार यामुळे पेपरफुटी, परीक्षा रद्द होणे, शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण गायब होणे आणि राजकीय गुंडगिरी ही आपल्या शिक्षण व्यवस्थेची ओळख झाली आहे. – प्रियंका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस