नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी चौकशीसाठी बोलावले आहे. दिल्ली सरकारतर्फे अबकारी धोरणाच्या अंमलबजावणीत कथित भ्रष्टाचारप्रकरणी ही चौकशी होणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की सिसोदिया यांना सोमवारी सकाळी अकराला ‘सीबीआय’च्या येथील मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
रविवारी सिसोदियांनी केलेल्या ‘ट्वीट’मध्ये नमूद केले आहे, की ‘सीबीआय’ने माझ्या घरावर छापा टाकून चौदा तास झडती केल्यानंतरही काहीही आक्षेपार्ह निष्पन्न झाले नाही. त्यांनी माझ्या ‘बँक लॉकर’ची झडती घेतली, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यांना माझ्या गावात काहीही सापडले नाही. आता त्यांनी मला बोलावले आहे. उद्या सकाळी अकराला ‘सीबीआय’च्या मुख्यालयात जाऊन, या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करेन. सत्यमेव जयते!
‘सीबीआय’ने या प्रकरणी ‘इंडो स्पिरिट’चे मालक समीर महेंद्रू, गुरुग्राममधील ‘बडी रिटेल प्रायव्हेट लिमिटेड’चे संचालक अमित अरोरा व ‘इंडिया अहेड न्यूज’चे व्यवस्थापकीय संचालक गौतम मुथांसह अनेकांची चौकशी केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले. एजन्सीने ‘आप’चे कार्यकर्ते आणि मनोरंजन आणि ‘इव्हेंट’ कंपनी ‘ओन्ली मच लाउडर’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नायर आणि हैदराबादस्थित व्यापारी अभिषेक बोईनपल्ली यांना अटक केली आहे. त्यांचे भागीदार अरुण पिल्लई यांचेही ‘सीबीआय’च्या आरोपपत्रात नाव आहे.
सिसोदिया, जैन हे आजचे भगतसिंग : केजरीवाल
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अबकारी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सोमवारी ‘सीबीआय’ने चौकशीसाठी बोलावले आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी रविवारी सिसोदिया व ‘आप’चे सध्या कैदेत असलेले मंत्री सत्येंद्र जैन यांना सध्याचे ‘भगतसिंग’ असे संबोधले आहे. तसेच आपल्या सरकारचा दिल्ली सरकारशी सुरू असलेला संघर्ष हा ‘दुसरा स्वातंत्र्यलढा’ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. सिसोदिया यांना सोमवारी ‘सीबीआय’ अटक करेल, अशी शक्यताही ‘आप’तर्फे व्यक्त करण्यात आली आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हेतुपुरस्सर हे पाऊल उचलले जात आहे. गुजरातमध्ये ‘आप’चा सत्ताधारी भाजपशी थेट सामना होत असल्याचा दावाही त्यांनी केला.