ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने मोठे पाऊल उचलले आहे. या रेल्वे अपघाताला सिग्नल यंत्रणेतील दोष कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू असतानाच सीबीआयने सोमवारी (१९ जून) रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा विभागातील सोरो सेक्शन सिग्नल जुनियर इंजीनियरचं घर सील केलं आहे. बालासोरमध्ये भाड्याच्या घरात राहणारा हा इंजीनियर सीबीआय चौकशीनंतर कुटुंबासह बेपत्ता असल्याची चर्चा आहे.
सीबीआयच्या प्राथमिक तपासात या जुनियर इंजीनियरची चौकशी करण्यात आली होती. सोमवारी सीबीआय पथक पुन्हा आल्यानंतर हा इंजीनियर त्याच्या घरी आढळला नाही. यानंतर सीबीआयने इंजीनियरचं घर सील केलं, असं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.
ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २९२ वर
दरम्यान, ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातातील मृतांची संख्या आता २९२ वर पोहचली आहे. रविवारी (१९ जून) पश्चिम बंगालमधील २४ वर्षीय गंभीर जखमी प्रवाशाचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. अपघात घडला तेव्हा २८७ प्रवाशांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला होता. यानंतर पाच प्रवाशांचा गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय १२०८ प्रवासी जखमी झाले आहेत.
हेही वाचा : रेल्वे यंत्रणेत छेडछाड केल्यानेच ओडिशातील भीषण अपघात, अधिकाऱ्यांचा दावा, म्हणाले, “सीबीआय…”
सीबीआयकडून रेल्वे अपघाताचा तपास
सीबीआयने ६ जून रोजी बालासोर रेल्वे अपघाताच्या प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेतला. या प्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. अपघातानंतर सिग्नल यंत्रणेशी छेडछाड झाल्याचा आरोप झाल्यानंतर सीबीआयकडे तपास गेला. सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर रेल्वे स्टेशनही सील करण्यात आलं. सिग्नल यंत्रणेशी संबंधित इंटरलॉकिंग पॅनलही सील करण्यात आला. तसेच पुढील सूचना येईपर्यंत कोणतीही ट्रेन बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर थांबवली जाणार नाही.