गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूचा तपास सीबीआयने (केंद्रीय अन्वेषण विभाग) हाती घेतला आहे. सूत्रांनी सांगितले, की मुंडे यांच्या अपघाती मृत्यूचा तपास प्रथम दिल्ली पोलीस करीत होते तो आता सीबीआयने हाती घेतला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस अनेक राजकीय नेत्यांच्या मागणीनंतर केली होती. गोपीनाथ मुंडे हे नरेंद्र मोदी यांच्या नवीन मंत्रिमंडळात ग्रामविकासमंत्री होते. चौसष्टवर्षीय मुंडे यांचा ३ जून रोजी सकाळी ते मोटारीने इंदिरा गांधी विमानतळाकडे जात असताना दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने पृथ्वीराज रोड-तुघलक रोड या गोलाकार चौकात राजधानीच्या मध्यवर्ती ठिकाणी मृत्यू झाला होता. मुंडे यांचा मेंदूतील रक्तस्राव व धक्क्याने मृत्यू झाला होता. त्यांची मान व यकृताला इजा झाल्या होत्या. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी गुरविंदर सिंग या दुसऱ्या वाहनाच्या चालकावर गुन्हा दाखल केला होता. भाजप नेते नितीन गडकरी यांनी मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. मुंडे यांची कन्या आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी निवेदनात असे म्हटले होते, की मुंडे यांच्या समर्थकांनी या घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करू नये. आपण पक्षनेत्यांशी सीबीआय चौकशीबाबत बोललो असून पंतप्रधान मोदी यांच्यावर आपला विश्वास आहे. तेच आता मुंडे यांच्या मृत्यूबाबत जी वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत त्यातून मार्ग दाखवतील अशी अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा