CBSE 10th Board Exam : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई (CBSE) आता दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत एक नवीन धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे. सीबीएसईने नवीन धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन धोरणानुसार १० वीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून दोनवेळा परीक्षा (SSC Exam) होणार आहे. या संदर्भातील मसुदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केला आहे. दरम्यान, वर्षातून दोनवेळा बोर्ड परीक्षा घेण्याचं हे नवीन धोरण २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या नवीन धोरणानुसार १० वीच्या वर्षातून दोनवेळा परीक्षा घेतली जाईल. त्यातील पहिली बोर्ड परीक्षा १७ फेब्रुवारी ते ६ मार्च या दरम्यान होईल. तसेच दुसरी बोर्ड परीक्षा ही ५ ते २० मे या कालावधीत घेण्यात येईल. मात्र, आता नवीन धोरणानुसार म्हणजे २०२६ पासून पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असणार नाही. आता या नवीन धोरणाचा मसुदा सीबीएसईने तयार केला असून या नवीन मसुद्याला अंतिम मंजुरी देखील दिल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत तयार केलेल्या नवीन मसुद्यावर ९ मार्चपर्यंत अभिप्राय देखील घेतले जाणार आहेत. पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी त्यावर अभिप्राय दिल्यानंतर या नव्या धोरणाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल किंवा शिक्कोमोर्तब केलं जाईल. आता यावर नेमकं अभिप्राय काय येतील? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

सीबीएसईच्या या नव्या धोरणाबाबत शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी बैठक देखील पार पडली होती. या बैठकीत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या या नव्या मसुद्याबाबत चर्चा झाली. या बैठकीत वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याच्या मसुद्यावर एकमत झाल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, या दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना एकच केंद्र देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना या दोन्ही परीक्षांसाठी शुल्क भरावं लागणार आहे. पण दोन्ही वेळा वेगवेगळं शुल्क भरण्याची आवश्यता नसून ते एकदा भरता येणार आहे. तसेच सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी आता कोणतीही पुरवणी परीक्षा घेणार नाही. या दरम्यान, सीबीएसईच्या परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतल्या गेल्यानंतर विद्यार्थ्यांचे सर्वोच्च गुण हेच अंतिम निकालासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.