मंगळवारी १ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये CBSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे देशभरातील CBSE बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, हरयाणा आणि गुजरात राज्य सरकारने देखील त्यांच्या राज्यातील बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या. पण आता परीक्षांशिवाय विद्यार्थ्यांच्या गुणांचं मूल्यमापन कसं करणार आणि त्यांना गुण कशाच्या आधारावर देणार? हा यक्षप्रश्न सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. CBSE पाठोपाठ ICSE नं देखील परीक्षा रद्द केल्यामुळे आता सर्वच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात सीबीएसईनं स्पष्टीकरण देत हे मूल्यमापन नेमकं कसं असेल, याचे सूतोवाच दिले आहेत.

सीबीएसईनं याआधीच दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यानंतर आता बारावीच्या परीक्षा देखील रद्द झाल्या आहेत. त्यापाठोपाठ देशातील काही राज्यांनी देखील तसाच निर्णय घेतला असून महाराष्ट्रात देखील तशाच प्रकारचा निर्णय होणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर CBSE मूल्यमापनासाठी नेमकं काय धोरण अवलंबणार, त्यावर इतर राज्यांचं धोरण देखील बऱ्याच अंशी अवलंबून असणार आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिलं आहे.

 

“घाबरून जाऊ नका!”

सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यासंदर्भात म्हणाले, “. बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन नेमकं कसं करायचं? यासंदर्भातला नेमका आराखडा ठरवण्यासाठी किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागेल. तोपर्यंत विद्यार्थी, पालकांनी घाबरून जाऊ नये. मूल्यमापन कसं व्हायला हवं आणि त्यासाठी कोणते निकष असावेत, याची मांडणी सध्या आम्ही करत आहोत. ती पूर्ण झाली, की आम्ही ती जाहीर करू. त्यामुळे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी यांनी थोडा वेळ वाट पाहायला हवी.”

केंद्रानं CBSE च्या परीक्षा रद्द करताच महाराष्ट्रातील बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांचं महत्त्वपूर्ण विधान!

CBSE पाठोपाठ ICSE च्या परीक्षाही रद्द!

अनेक दिवस चाललेल्या चर्चेनंतर अखेर केंद्र सरकारने सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. “CBSE च्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांची सुरक्षा याला सर्वाधिक प्राधान्य असेल. त्याविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अशा तणावपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची सक्ती केली जाऊ नये”, अशी भूमिका यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. त्यापाठोपाठ ICSE नं देखील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.