प्रेम आणि नाती निभावणं कोणत्याही वयात अवघडच असतं. प्रामुख्याने किशोरवयात या गोष्टी सांभाळणं सर्वात कठीण मानलं जातं. मुलांना या वयात सांभाळणं, त्यांचं मन सांभाळणं ही गोष्ट पालकांसाठीही अवघड असते. क्रश, पहिलं प्रेम किंवा प्रणय रोमांचक असू शकतो किंवा किशोरवयीन मुलांसाठी हा प्रश्न खूप जटिल आणि आव्हानात्मक असतो. याच विषयावरील एक धडा सीबीएसई बोर्डाच्या नववीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. पुस्तकातील या धड्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. तसेच यावर चर्चादेखील चालू आहे.
भारतातील किशोरवयीन मुलं क्रश किंवा प्रेमाबद्दलच्या त्यांच्या भावना पालकांशी शेअर करण्यास कचरतात. आपल्या प्रेमाबद्दल घरच्यांना काहीच कळू नये याबद्दल त्यांच्यात भीती असते. आपले पालक आपल्याला मारतील याचीदेखील त्यांना भीती असते. अशावेळी ही मुलं इंटरनेट किंवा त्यांच्या मित्रांचा सल्ला घेतात. परंतु, इंटरनेटवरील माहिती किंवा त्यांच्या वयाच्या मुलांनी दिलेले सल्ले नेहमी नुकसान करणारे असतात. त्यामुळे किशोरवयीन मुलांना हेल्दी नाती किंवा वाईट नात्यांबाबत समज असायला हवी. यासाठी त्यांचं समुपदेशन व्हायला हवं. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळायला हवं. सीबीएसई बोर्डाने त्यादृष्टीने स्तुत्य पाऊल उचललं आहे.
सीबीएसई बोर्डाने नववीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हॅल्यू एज्यकेशन अभ्यासक्रांतर्गत नवी पुस्तकं सादर केली आहेत. यामधील अभ्यास हा पूर्णपणे डेटिंग, नाती आणि प्रेमावर प्रकाश टाकतात. नात्यांच्या गुंतागुंतीवर चर्चा करण्यासाठी हा अभ्यासक्रम समर्पित आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना घोस्टिंग, कॅटफिशिंग, सायबरबुलिंगसारख्या गोष्टींवर, डेटिंगवर आणि संबंधित घटनांवर प्रकाश टाकला आहे. क्रश किंवा खास मैत्रीच्या विषयावर सोपी उदाहरणं देण्यात आली आहेत.
एका बाजूला अशा धड्यांची आवश्यकता काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर, बहुसंख्य लोकांनी या पुस्तकाचं स्वागत केलं आहे. अनेकांनी समाजमाध्यमांवर आश्चर्य आणि आनंद व्यक्त केला आहे. आजच्या काळात अशा शिक्षणाचीही गरज असल्याचं अनेक नेटीझन्सचं म्हणणं आहे.
हे ही वाचा >> “…तर वाराणसी मतदारसंघात मोदींच्या पराभवासाठी मोहीम सुरू होईल”, भाजपा नेत्याचा पंतप्रधानांना इशारा
दरम्यान, या धड्यांवर सुरू असलेल्या चर्चेत टिंडर इंडियानेदेखील यात सहभाग घेतला आहे. एका युजरने या पुस्तकाची मागणी केली आहे, तसेच यामध्ये दिलेल्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, असं म्हटलं आहे. तर टिंडर इंडियाने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, यामध्ये पुढचा धडा ‘ब्रेकअप्सचा सामना कसा करावा’ यावर असायला हवा.