गोव्यातील पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. पणजी महापालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये भाजपला महापालिकेवर वर्चस्व राखण्यात अपयश आले. ३० प्रभागांच्या या महापालिकेत काँग्रेसचे बंडखोर आमदार अटानसिओ मोन्सेरात यांच्या नेतृत्त्वाखालील उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांना धूळ चारली. याठिकाणी काँग्रेसने ९ प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले होते. मात्र, यामधील एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. पणजी हा भाजपचा गड मानला जातो. केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर हे पणजी मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत. मोन्सेरात यांच्या आघाडीने ३० पैकी १७ जागा जिंकल्या असून उर्वरित १३ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.
दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी हा निकाल म्हणजे भाजपसाठी धक्का आहे, हा दावा फेटाळून लावला. पणजी पालिकेत यापूर्वी भाजपचे १३ नगरसेवक होते आणि पुन्हा तितक्याच जाग निवडून आणण्यात आम्हाला यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी भाजपने छोट्या पक्षांच्या मदतीने पणजी पालिकेची सत्ता मिळाली होती. मात्र, आता मोन्सेरात यांच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपचे सत्तास्थापनेचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा