Man Shot In Burger King: पश्चिम दिल्लीच्या राजौरी गार्डनमधील बर्गर किंग आउटलेटमध्ये २६-वर्षीय व्यक्तीच्या चित्तथरारक हत्येचे दृश्य समोर आले आहे. या घटनेआधी अमन हा एका महिलेसह बर्गर किंगमध्ये बसला होता. ती त्या माणसाला तिच्या फोनवर एक फोटो दाखवत होती. इतक्यात अचानक रात्री ९.४१ वाजता पहिल्यांदा गोळीबार झाला. पीडितेच्या मागे बसलेल्या दोघांनी पिस्तुल काढून त्याच्या पाठीत गोळ्या झाडल्या. बंदुकीच्या गोळ्यांनी आऊटलेटमध्ये दहशत निर्माण केली आणि लोक पळताना दिसले. अमन बिलिंग काउंटरच्या दिशेने धावत गेला आणि केशरी आणि पांढऱ्या शर्टातील पुरुषांनी त्याचा पाठलाग करत पॉइंट-ब्लँक रेंजमधून त्याच्यावर लागोपाठ गोळ्या झाडल्या. शूटरपैकी एकाने काउंटरवर उभं राहून गोळीबार केला.

एका मिनिटापेक्षा कमी वेळात, संपूर्ण बर्गर किंग आउटलेट रिकामे झाले होते. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेत तीन वेगवेगळ्या बनावटीच्या तब्बल ३८ गोळ्या झाडून अमनची हत्या करण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नोंदवण्यात आले आहे. वेगवेगळ्या गोळ्यांवरून असे सूचित होते की दोन्ही शूटर्सनी दोनपेक्षा जास्त शस्त्रे वापरली होती.

यानंतर, बिलिंग काउंटरच्या मागे अमनचा मृतदेह सापडला, ज्यावरून मारेकऱ्यांनी गोळीबार केला तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला हे दिसून येते. हे मारेकरी २५ ते ३० वयोगटातील असल्याचे बर्गर किंगच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी सांगितले.

द मिस्ट्री वुमन

दरम्यान, या सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे अमनसह बसलेल्या महिलेच्या चेहऱ्यावर या घटनेचं जराही आश्चर्य भीती दिसली नाही उलट ती सरळ उठून फूड जॉइंटमधून निघून गेली. यातून असे दिसून येते की, बहुधा या महिलेने आधी अमनला बर्गर किंगमध्ये येण्याचे आमिष दाखवले असावे. या गुन्ह्यात महिलेच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचा गुन्हेगारी रेकॉर्ड असून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ती अमनचा फोन आणि पाकीट घेऊन गायब झाली आहे.

अमनच्या हत्येचं पोर्तुगाल कनेक्शन

पोलिसांनी या घटनेबाबत प्राथमिक अंदाज वर्तवताना २०२० मध्ये हरियाणात झालेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी टोळीतील शत्रुत्वातून ही धक्कादायक हत्या झाली असावी असे म्हटले आहे.

पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हिमांशू भाऊ, ज्याची टोळी दिल्ली आणि हरियाणामध्ये कार्यरत आहे, तो खंडणीसाठी कुख्यात आहे. तुरुंगात असलेला गुंड नीरज बवाना याचा साथीदार हिमांशु भाऊ २०२२ मध्ये देश सोडून पळून गेला होता. फरारी गुंड हिमांशू भाऊ, सध्या पोर्तुगालमध्ये असल्याचा संशय आहे. हिमांशू भाऊने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये अमनच्या हत्येची कबुली सुद्धा दिली आहे. ‘आमचा भाऊ’ शक्तीदादाच्या हत्येत अमनचा हात होता आणि ‘हा सूड होता’ असं हिमांशू भाऊंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याने सहभागी इतरांना सुद्धा तुमची पाळी लवकरच येईल असे म्हणत चेतावणी दिली आहे.