delhi acid attack cctv footage: दिल्लीमध्ये अॅसिड हल्ल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका १७ वर्षीय शाळकरी मुलीवर दिवसाढवळ्या अॅसिड हल्ला करण्यात आला. द्वारका परिसरामध्ये घडलेला हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
पीडित मुलगी रस्त्याच्या कडेने चालत असताना समोरुन एका दुचाकीवर दोनजण आले. त्यांनी या मुलीजवळ आल्यावर गाडीचा वेग कमी केला आणि त्याचवेळी मागे बसलेल्या व्यक्तीने या मुलीवर अॅसिड फेकलं. अगदी क्षणार्धात हा सारा प्रकार घडला. आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढल्याचंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर मुलगी आपल्या चेहऱ्यावर हात ठेवून पळताना दिसत आहे.
मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुलीची प्रकृती गंभीर असून तिचा सर्व चेहरा भाजला आहे. तिच्या डोळ्यातही अॅसिड गेलं आहे. मुलीने दोन आरोपींची ओळख पटवली असून, एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. “माझ्या दोन्ही मुली सकाळी एकत्र घराबाहेर पडल्या होत्या. यावेळी अचानक दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मोठ्या मुलीवर अॅसिड फेकलं,” अशी माहिती मुलीच्या वडिलांनी दिली आहे. या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा आहे. तुम्हीच पाहा हे सीसीटीव्ही फुटेज
मुलीने कोणी त्रास देत असल्याची तक्रार केली होती का? असं विचारण्यात आलं असता वडील म्हणाले “नाही, तिने अशी कोणतीही तक्रार केली नव्हती. ती कुठेही गेली तरी मी सोबत असायचो. दोघीही शाळेत जाताना मेट्रोने एकत्र प्रवास करायच्या.”.