ठाण्यातील बेकायदा कॉल तपशिल (सीडीआर) प्रकरणात आता अभिनेत्री कंगना रनौतचे नावही समोर आले आहे. कंगनाने अभिनेता हृतिक रोशनचे सीडीआर बेकायदेशीररित्या खासगी गुप्तहेरामार्फत मिळवल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. यामुळे कंगना अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

बेकायदा मोबाइल कॉल तपशील मिळवून दिल्याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने तीन दिवसांपूर्वी वकील रिजवान सिद्दिकी याला अटक केली होती. त्याने बेकायदा सीडीआर मिळवून किती लोकांना पुरवले याची चौकशी पोलीस करत आहे. रिझवानच्या चौकशीतून जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा तसेच कंगनाचे नावही समोर आले आहे.

कंगनाने हृतिक रोशनचे सीडीआर बेकायदेशीररित्या खासगी गुप्तहेरामार्फत मिळवले होते. तिने ह्रतिकचा मोबाईल नंबर वकील रिजवान सिद्दीकीला दिल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले. पोलीस अधिक चौकशी करत असल्याचेही ते म्हणालेत.

सीडीआर प्रकरणात अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफचेही नावही समोर येत आहे. आयेशा श्रॉफ आणि अभिनेता साहिल खान हे दोघे व्यावसायिक भागीदार आहेत. त्यांच्यात वाद झाल्याने आयेशाने साहिलचे बेकायदेशीररित्या सीडीआर मिळविले होते. ते सीडीआर आयेशाने वकील रिजवान सिद्दीकीला पुरवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आयेशा श्रॉफला चौकशीसाठी बोलावले आहे, अशी माहिती त्रिमुखे यांनी दिली. सीडीआर प्रकरणात सिनेसृष्टीतील कलावंताचे नाव समोर येत असून चौकशीनंतरच या कलाकार मंडळींनी हे सीडीआर का मिळवले, हे स्पष्ट होईल.

Story img Loader