देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले. इथल्या डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अपघातात सीडीएस बिपिन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूर या ठिकाणी हा अपघात झाला. इथल्या निलगिरीच्या डोंगळाळ प्रदेशामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण प्रवास करत होते. यात लष्कराच्या काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये होते. मात्र, या अपघातात रावत यांच्या पत्नीचंही निधन झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
घटनास्थळावरून एकूण ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उरलेल्या ३ जणांची प्रकृती गंभीर सांगितली जात होती. आता त्यात अजून दोन जणांचा मृत्यू झाला असून हवाई दलाच्या एका अधिकाऱ्यावर उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्या व्यक्ती ८० टक्क्यांहून जास्त प्रमाणात भाजल्याची देखील माहिती समोर आली होती. त्यामध्ये जनरल बिपिन रावत यांच्यावर देखील उपचार सुरू होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झाल्याचं अखेर जाहीर करण्यात आलं आहे.
दरम्यान, हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ व्यक्तींचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे जखमी असून त्यांच्यावर वेलिंग्टन येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती भारतीय वायुदलाकडून देण्यात आली आहे.
जनरल बिपीन रावत आणि त्यांच्यासोबत इतर लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निधनावर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, बिपिन रावत यांचं पार्थिव उद्या संध्याकाळी दिल्लीत आणलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.