पीटीआय, बंगळुरू
‘भविष्यातील युद्धांना पूरक तंत्रज्ञान निर्माण करणे हाच युद्ध जिंकण्याचा अंतिम उपाय नव्हे,’ असे प्रतिपादन संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी बुधवारी केले. तंत्रज्ञानाबरोबरच नव्या संकल्पना आणि धोरणे विकसित करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या ‘एअरो इंडिया’ हवाई प्रदर्शनात ‘भविष्यातील संघर्षांसाठी पूरक तंत्रज्ञान’ यावरील चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, ‘भविष्यातील युद्धपद्धतीनुसार तंत्रज्ञान पूरक करणे हा युद्ध जिंकण्यातील काही भाग निश्चित असतो. पण, युद्ध जिंकण्यासाठी नव्या कल्पना, नवी धोरणे आखून नव्या युद्धांसाठी तशा संघटना स्थापन करणे आवश्यक ठरते. तंत्रज्ञान केवळ ठरावीक भागाचेच उत्तर देईल.’
‘युद्ध प्रथम जमिनीवर सुरू झाले आणि मग त्याचा समुद्र आणि आकाशात विस्तार झाला. प्रत्येक नव्या युद्धपद्धतीचा जुन्यावर प्रभाव पडला. सातत्याने बदल त्यामुळे होत राहिले. जमिनीवरील युद्धात भौगोलिक परिस्थितीनुसार आणि शहरी संघर्ष तयार झाला. सागरी युद्धात आता पाण्याखालीही युद्ध होऊ शकते. हवाई युद्ध आता अवकाशापर्यंत जाऊन पोहोचले आहे. या ठिकाणी आपल्याला तंत्रज्ञानाची मदत होईल.’
सागरी आकाश क्षेत्रात स्थानिक उद्याोगांना संधी
‘सागरी आकाश क्षेत्रात स्थानिक उद्याोगांना देशी बनावटीच्या साहित्यनिर्मितीची संधी आहे,’ असे प्रतिपादन नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी केले. ‘आत्मनिर्भर इंडियन नेव्हल एव्हिएशन २०४७’ या विषयावर आयोजित सेमिनारमध्ये ते बोलत होते. अॅडमिरल त्रिपाठी म्हणाले, ‘भारतीय नौदल स्थानिक उद्याोगांना सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. सागरी आकाश क्षेत्रात मोठी संधी आहे. स्थानिक उद्याोगांना सहभागी होण्याचे मी आवाहन करतो. नौदलाबरोबर काम करून नव्या कल्पना शोधा, उपाय शोधा.’ नौदलासाठी उद्याोग म्हणजे भागीदारी नव्हे, तर परस्पर सहकार्याने एकत्रित काम करणे आहे, असेही त्यांनी सांगितले.
नागरी वापरासाठी हवाई दलाची साधने
लष्कर आणि नागरी क्षेत्रातही वापरता येतील, असे देशी बनावटीचे साहित्य एअरो इंडिया प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. हवाई दलाने तयार केलेले ‘उषा-ऊर्जा’ हे असेच एक देशी बनावटीचे ऊर्जानिर्मिती करणारे साधन. नागरिकांना अशा वस्तू खरेदी करता येणार आहेत. पर्यावरणातील स्थितीमुळे बॅटरी किंवा डिझेलवरील जनित्रे बंद पडतात, अशा ठिकाणी ‘उषा-ऊर्जा’ उपयुक्त ठरते. नागरी वापराकरिताही ते उपलब्ध आहे. त्याची किंमत ४.१४ लात्रुपये आहे. ग्रुप कॅप्टन राजेश यांनी याविषयीची माहिती दिली. देशी बनावटीची ड्रोनविरोधी यंत्रणाही उपलब्ध असून त्याची किंमत ६५ हजार रुपये इतकी आहे. विमानाची मागोवा यंत्रणाही नागरी वापराकरिता उपलब्ध आहे.