गेल्या काही दिवसांत भारतीय सैन्याने वेळोवेळी दात घशात घालूनही पाकिस्तानची भारताला डिवचण्याची खोड काही जात नाही. जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी सकाळी पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. आज सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबाराला सुरूवात केली. सध्यादेखील हा गोळीबार सुरू असून पाकिस्तानकडून लहान आणि स्वयंचलित बंदुका आणि उखळी तोफांचा जोरदार मारा सुरू आहे. भारतीय सैन्यही पाकच्या या गोळीबाराला तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहे. तर दुसरीकडे शोपियान जिल्ह्यात काल रात्री दहशतवाद्यांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर हल्ला चढवण्यात आला. शोपियान पोलीस ठाण्याजवळ असलेल्या सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. मात्र, सीआरपीएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत हा हल्ला निष्प्रभ ठरवला. त्यामुळे दहशतवाद्यांना पळ काढावा लागला. यानंतर सीआरपीएफकडून या भागात दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, हल्ल्याच्यावेळी दहशतवाद्यांनी फेकलेल्या ग्रेनेडमुळे तीन पोलीस आणि सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे. १ जूनपासून नवव्यांदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. तसेच गेल्या ७२ तासांत पाकिस्तानने तब्बल सहावेळा गोळीबार केल्याची माहिती संरक्षण मंत्रालायाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.

घुसखोरीचा डाव उधळला, ९६ तासांत १३ घुसखोरांचा खात्मा

भारत – पाकिस्तान सीमारेषेवर तणाव असून पाकमधून घुसखोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सीमारेषेवर सैन्याची करडी नजर असून घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावले जात आहेत. भारतीय सैन्याने गेल्या काही तासांमध्ये घुसखोरीचे प्रयत्न उधळताना १३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. सैन्याच्या सतर्कतेमुळे गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी ९ जून रोजी सैन्याने ५ घुसखोरांना कंठस्नान घातले होते. उरी सेक्टरमध्ये ही चकमक झाली होती. तर १० जूनला गुरेज सेक्टरमध्येही सैन्याच्या जवानांनी घुसखोरीचा डाव उधळून लावला होता. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. गुरेजमध्ये तीन ते चार दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात होते. सैन्याच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात एकाचा खात्मा झाला तर उर्वरित दहशतवाद्यांनी पळ काढला होता. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. जम्मू- काश्मीरमधील केजी सेक्टरमध्ये शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, उरी सेक्टरमध्ये कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांचे छायाचित्र सैन्याने रविवारी प्रसिद्ध केले. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केल्याचे सैन्याने सांगितले.