पाकिस्तानमध्ये निवडणुका जवळ आल्या असून, लष्कर सध्या कोणालाही उत्तर देण्यास बांधील नाहीये. अशा परिस्थितीत पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन होत आहे. पाकिस्तानने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर यावर्षी तब्बल ४८० वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनात ४०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी पाकिस्तानने १११ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. शस्त्रसंधी उल्लंघनादरम्यान भारतीय चौक्यांवर तसंच गावांवरही हल्ले करण्यात आले. यावेळी एकूण ११ बीएसएफ जवान शहीद झाले.
बीएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, पाकिस्तानने यावर्षी दर दिवसाला किमान तीन वेळा शस्त्रसंधी उल्लंघन केलं आहे. भारतीय जवांनांकडूv पाकिस्तानला चोख प्रत्युत्तरही दिलं जात आहे. २००३ मधील सीजफायर पॅक्ट पूर्णपणे लागू करण्यासंबंधी २९ मे रोजी पाकिस्तान आणि भारताच्या डीजीएमओची बैठकीत सहमती झाली असतानाही पाकिस्तानकडून भारताला उकसवण्याचा प्रकार होत आहे.
इस्लामाबादमध्ये सध्या सरकारची अनुपस्थिती पाकिस्तान लष्कराच्या या कारवाईचं मोठं कारण असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘आंतरराष्ट्रीय सीमारेषा आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन वाढलं आहे कारण पाकिस्तान रेंजर्स आणि तेथील जवान कोणत्याही नेतृत्वाला उत्तर देण्यास बांधील नाहीत. अशा परिस्थितीत स्थानिक कमांडर्सनी हे प्रकरण आपल्या हातात घेतलं आहे’.
गुप्तचर यंत्रणांनी शस्त्रसंधी उल्लंघन २५ जुलैला होणाऱ्या निवडणुकीपर्यंत शस्त्रसंधी उल्लंघन सुरु राहिल असा इशारा दिला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI देखील सक्रिय सहभाग घेत असून भारतीय बीएसएफ जवानांना टार्गेट करण्यासाठी दहशतवाद्यांची मदत घेतली आहे, ज्यांना पाकिस्तानी रेंजर्सही मदत करत आहेत.
बीएसएफ प्रमुख के के शर्मा यांनी भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यासंबंधी म्हटलं आहे. यामुळेच गेल्या दोन वर्षात जवळपास १२ वेळा पाकिस्तानला माघार घ्यावी लागली होती.