जम्मू आणि सांबा जिल्ह्य़ातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील सात ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी गोळीबार करण्याची पुन्हा एकदा आगळीक केली आहे. या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान जखमी झाले आहेत.
पाकिस्तानच्या रेंजर्सनी गेल्या २४ तासांत शस्त्रसंधीचे पाचव्यांदा उल्लंघन करून सीमेवरील सात भारतीय ठाण्यांवर त्याचप्रमाणे नागरी भागांवर हल्ला केला. आंतरराष्ट्रीय सीमेवरील आर. एस. पुरा, पारगवाल आणि सांबा जिल्ह्य़ांत हल्ला चढविला, असे पोलिसांनी सांगितले. त्याचप्रमाणे खारकोटा, खारकल, एएमके, मांगरल, राजपौरा, निकोवाल आदी ठिकाणी पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला.
निकोवालमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे गंगन ठाकूर आणि हसदा हे दोन कॉन्स्टेबल जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनीही योग्य ठिकाणी दबा धरून पाकिस्तानच्या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर दिले.
जम्मू जिल्ह्य़ातील नजवाल-पारगवाल पट्टय़ात पाकिस्तानच्या लष्कराने नागरी भागांत हल्ला केला त्यामध्ये तीन लहान मुलांसह पाच जण जखमी झाले.  पाकिस्तानकडून मोठय़ा प्रमाणावर होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे २२ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय सीमा भागाला भेट देऊन पाहणी करणार आहेत. दरम्यान, एकाचवेळी चर्चा आणि हल्ले हे समीकरण चालणार नाही, असे मत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी व्यक्त केले.