पाकिस्तानने शस्त्रसंधीचा पुन्हा भंग करून गुरुवारी साम्बा क्षेत्रातील १३ चौक्यांवर गोळीबार केला असून कालचा धडा पाकिस्तानच्या गळी उतरलेला दिसत नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केली आहे. गेल्या तीन दिवसांतला हा शस्त्रसंधीचा तिसरा तर आठ दिवसांतील सातवा भंग आहे. कॉन्स्टेबल श्रीराम गवारिया या गोळीबारात शहीद झाल्यानंतर बुधवारी भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे चार सैनिक ठार झाले होते.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या या कागाळ्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. उभय देशांचे अधिकारी सतत संपर्कात असून परिस्थिती लवकरच निवळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बुधवारी पाकिस्तानचे चार सैनिक ठार झाल्यानंतर पाकिस्तानने पांढरे निशाण फडकावीत गोळीबार थांबवण्याची विनंती केली होती. त्यानंतर चौघा सैनिकांचे मृतदेह उचलून नेल्यानंतर रात्रीपासून पाकिस्तानच्या बाजूने पुन्हा मारा सुरू झाला. त्याला सीमा सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. पहाटे सहा वाजेपर्यंत सीमेवर गोळीबार सुरू होता. यात उभय
बाजूने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक राकेश शर्मा यांनी सांगितले की, भारतात घुसखोरीसाठी सीमेवर ५० ते ६० अतिरेकी तयारीत असल्याची खबर आहे. आमच्या कडेकोट बंदोबस्तामुळे ही घुसखोरी रखडत असल्याने नैराश्यातून पाकिस्तानने गोळीबार सुरू केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
आम्ही कधीही गोळीबार सुरू करीत नाही. पाकिस्तानने कागाळी केली तर मात्र आता जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल आणि मग जी हानी होईल तिला पाकिस्तानचे सुरक्षा दलच जबाबदार राहील, असा इशाराही शर्मा यांनी दिला.
*गेल्या वर्षी पाकिस्तानने शस्त्रसंधीचा ५५० वेळा भंग केला होता.
*२००३मध्ये शस्त्रसंधीभंगाने कळस गाठला होता आणि त्या वेळी भारत-पाकिस्तान सीमेवर झालेल्या चकमकींत १३ जण मृत्युमुखी पडले होते तर हजारो नागरिक विस्थापित झाले होते.
नववर्ष दिनीदेखील पाकिस्तान शांत राहू इच्छित नाही, हे दिसून आले. रात्री साडेबारा वाजता त्यांनी गोळीबार सुरू केला. बुधवारच्या धडय़ातून पाकिस्तान काही शिकलेले दिसत नाही.
– मनोहर पर्रिकर, संरक्षणमंत्री