पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत असून भारतासाठी हा गंभीर चिंतेचा विषय आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी शुक्रवारी येथे केले. उभय देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सध्या चर्चा सुरू असून त्यातून काय निष्पन्न होते, ते पाहावे लागेल, असे ते म्हणाले.
आपल्या दोन जवानांची पाकिस्तानने केलेली हत्या आणि त्यांच्या मृतदेहांची केलेली विटंबना ही बाब संतापजनक आहे. ही घटना एकमेव नसून गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीच्या कराराचा भंग होत आहे, भारताने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून तो आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे, असे ते म्हणाले. उभय देशांचे ‘डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स’चे अधिकारी परस्परांच्या संपर्कात असून त्या चर्चेतून काय साध्य होते, याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत, असे त्यांनी सांगितले. भूतकाळाच्या प्रमाणात काश्मीरमधील हिंसाचार कमी झाला आहे, मात्र त्याच वेळी पाकिस्तानकडून काश्मीरमार्गे होणारी घुसखोरीही वाढली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील घडामोडींकडे आमचे बारीक लक्ष असून सीमेवर पुरेसे सैन्य तैनात असल्याने काळजीचे कारण नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, दोन्ही देशांमधील परिस्थिती कमालीची चिघळली असून उभय देशांनी संयम राखून चर्चेने वाद सोडवण्यावर भर द्यावा, असे आवाहन चीनने शुक्रवारी केले.