पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र कामकाज सल्लागार सरताझ अझीज यांनी काश्मीरमधील फुटिरतावादी हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांशी एका बैठकीत चर्चा केल्याबाबत भारताचे परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद नाराजी व्यक्त केली. सलमान खुर्शीद यांची ‘अ‍ॅसेम’ (आशिया-युरोप परराष्ट्र मंत्री गट) या मंत्रिपातळीवरील परिषदेच्या निमित्ताने अझीज यांच्याशी भेट झाली, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्यक्ष ताबारेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन हे दोन्ही देशातील संवादाला अनुकूल वातावरण तयार करण्यात बाधा आणणारे आहे, असे मत खुर्शीद यांनी व्यक्त केले आहे. दोन्ही देशात शाश्वत शांतता नांदावी असे वाटत असेल तर आमच्या भावनांचा व संवेदनांचा आदर केला पाहिजे असे सांगून खुर्शीद म्हणाले की, पाकिस्तानने प्रत्यक्ष ताबारेषेवर शस्त्रसंधीचे केलेले उल्लंघन हे शांतता प्रक्रियेला बाधक आहे.
पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा ओझरता उल्लेख करून खुर्शीद म्हणाले की, अलीकडेच ज्या घटना घडल्या त्या भारत सरकार किंवा आमच्याकडील कुणालाही शांतता प्रक्रियेस उत्तेजन देणाऱ्या वाटल्या नाहीत उलट त्यामुळे परिस्थिती चिघळली आहे. दोन्ही देशात गंभीर पातळीवर शांतता चर्चेसाठी योग्य परिस्थिती निर्माण होण्याची पाकिस्तानची इच्छा आहे की नाही अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. भले त्या चर्चेची फलनिष्पत्ती काहीही असो असे ते म्हणाले. दोन्ही देशात जर संवादाची प्रक्रिया सुरू करायची असेल तर त्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणे गरजेचे आहे व ते दोन्ही देशांनी तयार करायचे आहे. ही एकतर्फी प्रक्रिया नाही. दुर्दैवाने काही घटना चर्चेस अनुकूल वातावरण तयार होण्यासाठी मारक अशाच आहेत, असे ते म्हणाले.
सरताझ अझीज हे फुटिरतावादी र्हुीयत नेत्यांना भेटल्याबाबत विचारले असता खुर्शीद म्हणाले की, आपण काय बोलतो, काय करतो हे महत्त्वाचे आहे. जे आपण करतो ते काळजीपूर्वक केले पाहिजे. आमच्या शेजारी देशाच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना आपण काही सल्ला देऊ इच्छित नाही पण शाश्वत शांतता प्रक्रियेसाठी संवादाचे काही गंभीर व अर्थपूर्ण मार्ग आहेत, त्यामुळे भारताच्या भावना व संवेदना यांचा त्या देशाने आदर करावा अशी आमची अपेक्षा आहे.

Story img Loader