गुजरातच्या अहमदाबाद पोलीस ठाण्यात भाजपा नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. यामुळे गुजरातमधील राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला असून पोलीस ठाणे हे भाजपाचे कार्यालय आहे का? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये डीसीपी कानन देसाई हे गुजरातच्या अहमदाबादमधील दर्यापूर पोलीस ठाण्याच्या चेंबरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भाजप नेत्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. भाजपा नेते हिमांशू चौहान आणि लोक कलाकार आणि भाजप नेते योगेश गडवी पोलिसांच्या चेंबरमध्ये दिसत आहेत. एवढंच नव्हे तर व्हिडिओमध्ये पोलीस वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याचंही स्पष्ट दिसत आहे.

हेही वाचा >> Meta AI in WhatsApp: आता AI थेट तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर; वाट्टेल ते विचारा, ते सगळं सांगेल! वाचा नेमकं वापरायचं कसं?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, “भाजपा सरकार गुजरातमधील भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी पोलीस ठाण्यांमध्ये वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी विशेष व्यवस्था करत आहे. येथे डीसीपीच्या उपस्थितीत भाजपा नेत्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते.”

“भाजपा सरकारमध्ये हा नियम आहे का? गुजरातचे गृहमंत्री, तुमच्या अधिकाराने हे घडले का?” असा सवाल त्यांनी केला. व्हिडिओने सर्वत्र लक्ष वेधल्यानंतर, अहमदाबाद पोलिसांनी दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये केक कापण्याचा कार्यक्रम दर्शविणाऱ्या व्हायरल व्हिडिओबद्दल स्पष्टीकरण जारी केले. पोलिसांनी सांगितले की व्हिडिओबद्दल काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, यामुळे पोलीस ठाण्याची प्रतिमा मलिन केली जात आहे.

हेही वाचा >> UGC-NET २०२४ परीक्षेसाठी नवीन तारखा जाहीर; पेपरफुटी रोखण्यासाठी आता नव्या पद्धतीने होणार परीक्षा!

प्रसिद्धीपत्रकात पोलिसांनी स्पष्ट केले की, “२३ तारखेला अहमदाबाद येथे आगामी रथयात्रा उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी दर्यापूर पोलीस स्टेशन परिसरात हिंदू-मुस्लिम ऐक्याला प्रोत्साहन देणारे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर सर्व अधिकारी आणि सामाजिक नेते यावेळी पोलीस ठाण्यामध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांनी रथयात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यासाठी तीन केक आणले.

“केकवर ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ संदेश नव्हते. तसंच, योगेश गढवी यांनी नमूद केले की हिमांशूभाईंचा वाढदिवस होता आणि त्यांनी फक्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या मेळाव्याचा हेतू कोणाचाही वाढदिवस साजरा करण्याचा किंवा कोणताही राजकीय हेतू साधण्याचा नव्हता.”