नवी दिल्ली : पाऊस मोजण्याच्या तुरळक केंद्रापासून आज जगातील विख्यात अशा हवामान केंद्रापर्यंत भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मजल मारली आहे. १५ जानेवारी रोजी भारतीय हवामान खात्याला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. या दीडशे वर्षांतील ‘आयएमडी’चा प्रवास थक्क करणारा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशात १८६४मध्ये आलेले भीषण चक्रीवादळ, १८६६ आणि १८७१मध्ये मान्सूनने घातलेला धुमाकूळ या पार्श्वभूमीवर ‘आयएमडी’ची १५ जानेवारी १८७५ रोजी स्थापना करण्यात आली. ‘आयएमडी’चे महासंचालक मृत्यूंजय मोहापात्रा यांनी सांगितले, ‘एच. एफ. ब्लँडफोर्ड भारतासाठी हवामानाची माहिती देणारे पहिले तज्ज्ञ होते. त्यांनी अखंड भारतामध्ये पडणाऱ्या पावसाचा पहिला नकाशा बनविला. ७७ ठिकाणी पडणाऱ्या पावसाची मोजणी त्यांनी केली होती. तेव्हापासून सुरू झालेला ‘आयएमडी’चा प्रवास आतापर्यंत सुरू असून, ‘आयएमडी’ आता अधिक आधुनिक झाले आहे.’

२०२३च्या अहवालानुसार, ‘आयएमडी’कडे ३९ ‘डॉप्लर’ हवामान रडार आहेत. तसेच, इनसॅट ३डी/३डीआर उपग्रहाच्या सहाय्याने दर १५ मिनिटांनी अद्यायावत माहिती देणारी यंत्रणा आहे. याच्या जोडीला ८०६ स्वयंचलित हवामान केंद्रे, २०० शेतीशी संबंधित स्वयंचलित हवामान केंद्रे, ५,८९६ पावसावर देखरेख ठेवणारी केंद्रे, ८३ वीज कोसळण्याची माहिती देणारी केंद्रे आहेत. ‘आयएमडी’च्या नजीकच्या काळातील मुख्य उपलब्धीमध्ये तीव्र स्वरुपातील हवामानाच्या अंदाजाचा २०१५ मध्ये घेतलेला अहवाल, अद्यायावत उपग्रह यंत्रणा आणि २०१८ मधील चक्रीवादळाची दर ६ मिनिटांनी घेतलेल्या माहितीचा समावेश करता येईल. विभागाचे संख्यात्मक पद्धतीचे हवामान अंदाजाचे प्रारूप काही तासांपासून पूर्ण हंगामातील हवामानाचा अंदाज वर्तवू शकते.

जनतेला हे अंदाज पाहता यावेत, यासाठी ‘आयएमडी’ने ‘मौसम’सह विविध मोबाइल अॅप्स तयार केली आहे. या अॅपमधून देशभरातील हवामानाचा अंदाज वर्तविला जाऊ शकतो. ‘आयएमडी’ केवळ भारतापुरतेच काम करीत नसून, हिंदी महासागराच्या उत्तरेकडील १३ देशांना चक्रीवादळाचा अंदाज आणि इशाऱ्यांची माहिती देते.

‘अंदाजांची अचूकता वाढली’

‘आयएमडी’चे महासंचालक मृत्यूंजय मोहापात्रा म्हणाले, ‘तीव्र स्वरुपाच्या हवामानाच्या अंदाजाची अचूकता २०१४च्या तुलनेत २०२३ मध्ये ५० टक्क्यांनी वाढली आहे. या अचूक अंदाजामुळे मालमत्तेची हानी; तसेच जीवितहानी कमी झाली आहे. २०२३ पर्यंत पाच दिवसांच्या अंदाजाची अचूकता २०१७च्या एका दिवसाच्या अंदाजाइतकी आली आहे. चक्रीवादळाचा अंदाज अधिक अचूकतेने, जवळपास एकही चूक नसलेला वर्तविला जाऊ लागला आहे. अतिपावसाच्या हवामान अंदाजाची अचूकता ८० टक्के, वादळी पावसाच्या अंदाजाची अचूकता ८६ टक्के, उष्णतेच्या आणि शीत लाटांचा अंदाज ८८ टक्के अचूक आहे.’

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebration of 150th foundation day on january 14 of the india meteorological department zws