वादग्रस्त चित्रपट ‘मेसेंजर ऑफ गॉड’ला ‘फिल्म सर्टिफिकेशन अॅपलेट ट्रायब्यूनल’ने मंजुरी दिल्यानंतर सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्षा लीला सॅमसन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी रात्रीच त्यांनी बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमीत राम रहिम सिंग यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला मंजुरी देण्यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, ‘फिल्म सर्टिफिकेशन अॅपलेट ट्रायब्यूनल’ने मंजुरी दिल्यामुळे लीला सॅमसन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्या म्हणाल्या, या चित्रपटाला मंजुरी मिळाल्याचे मी ऐकले. मला अजून लेखी स्वरुपात काहीही मिळालेले नाही. सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशनवर अविश्वास निर्माण होण्यासारखे चित्र आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय मी घेतला असून, त्यावर ठाम आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांना मी राजीनाम्याबद्दल माहिती दिली आहे.
चित्रपटातील संवाद आणि दृश्य़ांमुळे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र द्यायचे का, याचा निर्णय ‘फिल्म सर्टिफिकेशन अॅपलेट ट्रायब्यूनल’वर सोपविला होता. हा चित्रपट शुक्रवारीच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, लीला सॅमसन यांनी या चित्रपटाला मंजुरी दिल्यामुळे राजीनामा दिल्याचे थेटपणे म्हटलेले नाही. त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयावर टीका केली आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचार आणि सरकारी हस्तक्षेप यावरही बोट ठेवले आहे.

Story img Loader