चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे (सेन्सॉर बोर्ड) सदस्य आणि चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी एआयबी नॉकआऊट्स रोस्ट ऑफ रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर या कार्यक्रमात चित्रपट निर्माते करण जोहर यांनी केलेल्या कथित अश्लील शेरेबाजीबद्दल ट्विटरवरून जे वक्तव्य केले त्यावरून गदारोळ माजला आहे.
एआयबी नॉकआऊट्स रोस्ट ऑफ रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर हा कार्यक्रम २० डिसेंबरला वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात पार पडला. त्यात करण जोहर यांच्यासह दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा आणि आलिया भट या बॉलीवूडच्या अभिनेत्री हजर होत्या. कार्यक्रमात परस्परांना उद्देशून अश्लील शेरेबाजी आणि हास्यविनोद करण्यात आला. या कार्यक्रमाचा व्हिडीओ यूटय़ूबवर अपलोड करण्यात आल्यानंतर विविध क्षेत्रांतून त्यावर टीका करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने त्याची नोंद घेत चौकशी सुरू केली.
त्यासंदर्भात पंडित यांनी करण जोहर यांची निंदा करणारे मतप्रदर्शन करून राज्य सरकारच्या चौकशीला पाठिंबा दर्शवला. हा कार्यक्रम म्हणजे व्यासपीठावर पॉर्न शो करण्याचाच प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र त्यांच्या या मतप्रदर्शनावरून वादंग माजले आहे.
जोहर यांनी उत्तरादाखल केलेल्या ट्विटमध्ये पंडित यांना उद्देशून म्हटले आहे की, तो तुमचा विषय नाही, त्यात उगाच नाक खुपसू नका.
सोनाक्षी सिन्हानेही जोहर यांची बाजू घेत पंडित यांच्या विरुद्ध मत व्यक्त केले आहे. बरे आहे की, ट्विटर कधीही अश्लील भाषा न वापरणाऱ्या सदाचारी आणि दांभिक लोकांनी भरलेले आहे, असे तिने उपरोधिकपणे म्हटले आहे.
काँग्रेस प्रवक्ते सलमान सोझ यांनी पंडित यांच्या ट्विटला उत्तरादाखल केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंडित यांनी जोहर यांच्याविरुद्ध गरळ ओकणे स्वीकारार्ह आहे का? त्यांनी राजीनामा (सेन्सॉर बोर्डाचा) द्यावा किंवा त्यांना काढून टाकावे.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे की, सरकारला संस्कृतीरक्षकाची भूमिका घ्यायची नाही. पण सांस्कृतिक खाते त्या कार्यक्रमाला कायदेशीर परवानगी घेतली होती का, ते तपासून पाहील. ती घेतली असल्यास आम्ही त्यांना थांबवू शकत नाही. आदल्या दिवशी तावडे यांनी पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणात चौकशी जाहीर केली होती.

Story img Loader