नागपूर : मे २०२५मध्ये आशियाई सिंहांच्या १६व्या गणनेचा अंदाज घेण्यात येणार आहे. केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. दरम्यान, केंद्र सरकारने सिंहांच्या संवर्धनासाठी दोन हजार ९०० कोटींहून जास्त निधी मंजूर केला आहे.

जागतिक वन्यजीव दिनानिमित्त राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची सातवी बैठक गुजरातमधील जुनागड येथे आयोजित करण्यात आली. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष पंतप्रधान मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी त्यांनी मे महिन्यात १६ व्या आशियाई सिंहांच्या संख्येचा अंदाज घेण्यात येईल असे सांगितले. तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे मानव-वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी उत्कृष्टता केंद्र ‘सॅकॉन’ची स्थापना करण्याची घोषणा केली.

राष्ट्रीय वन्यजीव मंडळ ही वन्यजीव संरक्षणाबाबत सरकारला सल्ला देणारी एक वैधानिक संस्था आहे. यात लष्करप्रमुखासह विविध राज्यांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, मुख्य वन्यजीव रक्षक व विविध राज्यांचे सचिव यांचा समावेश असलेले ४७ सदस्य असतात.

केंद्र सरकारने गुजरातमध्ये आढळणाऱ्या आशियाई सिंहांचे संवर्धनाकरिता ‘सिंह प्रकल्पा’साठी २ हजार ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. सध्या गुजरातमधील नऊ जिल्ह्यांमधील ५३ तालुक्यांमध्ये सुमारे ३० हजार चौरस किलोमीटर परिघात आशियाई सिंहांचे वास्तव्य आहे.

पंतप्रधान मोदींची ‘सिंह सफारी’

सासन (गुजरात) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गिर येथील वन्यजीव अभयारण्यात भ्रमंती केली. जागतिक वन्यजीव दिनानिमित्त त्यांनी अभयारण्याला भेट दिली. गिर येथील अभयारण्य सिंहांचे घर असल्याचे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, असे त्यांनी ‘एक्स’वरील टिप्पणीत लिहिले. पंतप्रधानांनी जंगलातील भ्रमंतीदरम्यान सिंहाची छायाचित्रेही प्रसिद्ध केली.

Story img Loader