नवी दिल्ली : गुजरात निवडणुकांच्या तारखांच्या घोषणेवरून काँग्रेसने आक्षेप घेतला असल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोग शंभर टक्के निष्पक्ष असल्याचा दावा मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुरुवारी केला.
मोरबी पूल दुर्घटनेच्या मृतांच्या कुटुंबीयांना, तसेच जखमींना बुधवारी राज्य सरकारकडून भरपाई देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली होती. या कुटुंबांसाठी सरकारला आश्वासने देता यावीत, यासाठी गुजरात निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेला विलंब केला गेला, अशी टीका प्रदेश काँग्रेसने केली आहे. मात्र हा आक्षेप राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत पूर्णपणे फेटाळला. ‘क्रिकेट सामन्यात पराभूत झालेला संघ तिसऱ्या पंचाला दोष देतो. निवडणूक आयोगाकडे तिसरा पंचही नाही. आम्ही पूर्णपणे निष्पक्ष प्रक्रिया राबवतो. ही प्रक्रिया निष्पक्ष नसल्याची तक्रार कोणी केली तर तक्रारीसंदर्भात तातडीने कारवाई केली जाईल, असे राजीव कुमार म्हणाले.
निवडणुकीची घोषणा केली की, राजकीय पक्ष वा उमेदवार विनाकारण नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा निवडणूक मतदान यंत्रांवर आक्षेप घेतात, मतदान होईपर्यंत अशा आक्षेपांची शेकडो पत्रे आयोगाला पाठवली जातात. पण मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यावर आक्षेप घेणारा राजकीय पक्ष जिंकतो, तेव्हा मात्र आक्षेप बंद होतात. ‘आक्षेपार्ह’ निवडणूक मतदार यंत्रेच त्यांना जिंकून देतात, असा युक्तिवाद राजीव कुमार यांनी केला.
निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही गोंधळ होऊ नये वा बेकायदा घटना होऊ नये, याची दक्षता घेतली जाते. मतदारांनी वा उमेदवारांनी मतदानावेळी कोणतीही तक्रार केल्यास निवडणूक आयोग त्याची तातडीने दखल घेईल, तक्रार केल्यानंतर १०० मिनिटांमध्ये निवारण केले गेले नाही तर आयोगाच्या निष्पक्षतेवर शंका उपस्थित करा, तोपर्यंत विनाकरण आरोप करणे योग्य नाही, असेही राजीव कुमार म्हणाले.
निवडणूक आयोगाची कृती कुठल्याही शाब्दिक स्पष्टीकरणापेक्षा महत्त्वाची आहे. निवडणूक आयोगावर घेतल्या जाणाऱ्या कुठल्याही आक्षेपावर आम्ही कितीही स्पष्टीकरण दिले तरी कदाचित आक्षेप घेणाऱ्यांचे समाधान होणार नाही. निवडणूक प्रक्रिया आणि निकाल योग्य नसल्याचे म्हणणे देशातील मतदारांच्या बौद्धिक क्षमतेचा अपमान करण्याजोगे ठरेल.
– राजीव कुमार, मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त