नवी दिल्ली : देशात आत्तापर्यंत वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये ‘व्हीव्हीपॅट’च्या ४.५ कोटी कागदी मतपावत्यांची मोजणी केली गेली, एकाही पावतीमध्ये विसंगती आढळली नाही, असा दावा केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
मतदानयंत्रांमध्ये फेरफार केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. यासंदर्भातील निकालात २०१९मध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कुठल्याही पाच मतदानयंत्रांना जोडलेल्या ‘व्हीव्हीपॅट’मधील कागदी मतपावत्या मोजण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर ६७ हजार ‘व्हीव्हीपॅट’मधील ४.५ कोटी कागदी मतपावत्यांची मोजणी केली गेली. मतदानयंत्रांमधील मतांची मोजणी आणि ‘व्हीव्हीपॅट’मधील कागदी मतपावत्यांची मोजणी यांच्यामध्ये एका मतपावतीचाही फरक आढळला नाही, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>Ajith Kumar : साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा मोठा अपघात, रेसच्या सरावदरम्यान क्रॅश झाली कार; दुर्घटनेचा Video Viral
मतमोजणी आणि मतदानाचा आकडा यामध्ये तफावत असून सर्वच्या सर्व ‘व्हीव्हीपॅट’च्या मतपावत्यांची मोजणी करण्याची मागणी विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र ती न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर पाच ‘व्हीव्हीपॅट’च्या मतपावत्यांच्या मोजणीचा पर्याय न्यायालयाने दिला. तांत्रिक बिघाड झालेले मतदानयंत्र बाजूला ठेवले जाते. अंतिम मतमोजणीनंतर मताधिक्य बिघाड झालेल्या मतदानयंत्रातील मतांपेक्षा कमी असेल तर अशा मतदानयंत्राशी जोडलेल्या ‘व्हीव्हीपॅट’च्या कागदी मतपावत्यांची मोजणी केली जाते. मताधिक्य मोठे असेल तर निकालावर फरक पडत नसल्यामुळे बिघाड झालेल्या मतदानयंत्रातील मतांची मोजणी केली जात नाही, असेही राजीव कुमार यांनी सांगितले.
हेही वाचा >>>फ्रान्सच्या अतिउजव्या नेत्याचे निधन; स्थलांतरितांना कठोर विरोध करणारे ज्यँ मारी ल पेन कालवश
मतदानयंत्रांमध्ये फेरफार करता येत नाही असे वारंवार स्पष्ट करून देखील राजकीय पक्षांकडून शंका घेतल्या जात आहेत. पण, २०२०च्या बिहार विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या ३० राज्ये- केंद्रशासित प्रदेशांतील विधानसभा निवडणुकीत १५ वेगवेगळे राजकीय पक्ष सर्वाधिक जागा मिळवणारे पक्ष ठरले, असे राजीवकुमार यांनी अधोरेखित केले.
दिल्लीत तिरंगी लढत
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप), भाजप व काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार आहे. सलग तिसऱ्यांदा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा ‘आप’चा प्रयत्न राहील. २०१५ मध्ये ‘आप’ने ६७ तर, २०२० मध्ये ६२ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला होता. २०१३ मध्ये ‘आप’ने काँग्रेसच्या पाठिंब्यावर दिल्लीत पहिल्यांदा सत्ता मिळवली होती. दिल्लीमध्ये ‘आप’ गेली १५ वर्षे सत्तेत आहे मात्र, भाजपला दिल्लीतील सत्तेने २६ वर्षे हुलकावणी दिली आहे. त्यामुळेच तीनही पक्षांसाठी यंदाची विधानसभा निवडणूक प्रतिष्ठची मानली जात आहे.
२०२०मधील बलाबल
एकूण जागा ७० ● ‘आप’ ६२ ● भाजप ८ ● काँग्रेस ०