केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषेदत दहशतवादाबद्दल विचारणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला चांगलंच सुनावलं. पाकिस्तानी पत्रकाराने एस जयशंकर यांना कधीपर्यंत दक्षिण आशियाला नवी दिल्ली, काबूल आणि पाकिस्तानमधील दहशतवादाला सामोरं जावं लागणार आहे अशी विचारणा केली. यावर एस जयशंकर यांनी त्याला ‘तुम्ही चुकीच्या मंत्र्याला विचारणा करत आहात’ असं उत्तर दिलं. “पाकिस्तान किती काळ दहशतवादाचा सराव करू इच्छितो हे तुम्हाला पाकिस्तानचे मंत्रीच सांगू शकतील,” असंही ते म्हणाले.
एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहशतवादाचा धोका अजून गंभीर झाला असल्याचं म्हटलं. “आम्ही अल-कायदा, बोको हराम आणि अल शदाबसह त्यांच्या सहकारी संघटनांचा विस्तार होताना पाहिलं आहे,” असं एस जयशंकर म्हणाले.
लादेनला आसरा देणाऱ्याने आम्हाला शिकवू नये!; पाकिस्तानला भारताचे प्रत्युत्तर
एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत संबोधित करताना सात प्रमुख मुद्द्यांवर भाष्य केलं. “दहशतवादाचे समकालीन केंद्र अद्यापही सक्रीय आहे,” असं यावेळी ते म्हणाले. “दक्षिण आशियात जुन्या पद्धती आणि स्थापित नेटवर्क अद्यापही आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.
“लादेनला आसरा देणाऱ्याने आम्हाला शिकवू नये”
‘‘अल- कायदा म्होरक्या ओसामा बिन लादेनला आसरा देणाऱ्या आणि शेजारच्या राष्ट्रातील संसदेवर हल्ला करणारा देश सामर्थ्यशाली संयुक्त राष्ट्रांसमोर उपदेश देण्यास पात्र नाही,’’ अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं. संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेत खुल्या चर्चेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जोरदार टिप्पणी केली.
जयशंकर म्हणाले, “संयुक्त राष्ट्रांची विश्वासार्हता सध्याच्या काळातील प्रमुख आव्हानांच्या प्रभावी प्रतिसादावर अवलंबून आह़े मग ते साथीचे आजार, हवामान बदल, किंवा दहशतवाद आदी मुद्दे असो. आम्ही विविध समस्यांवर सर्वोत्तम उपाय शोधत असताना पाकिस्तान अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करत आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या या देशाने आम्हाला शिकवू नये, अशा प्रकारे उपदेश देण्याचा त्यांना अधिकार नाही”.