नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याला सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी कारणीभूत असल्याची कबुली केंद्र सरकारने गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिली. ‘सुरक्षा व्यवस्थेकडून कुठल्या ना कुठल्या प्रकारची चूक झाली आहे, म्हणून तर आपण या घटनेबद्दल बोलत आहोत’,असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठकीत सांगितल्याचा दावा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला. त्याच वेळी दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांवर सरकारकडून होणाऱ्या कोणत्याही संभाव्य कारवाईला सर्व पक्षांनी एकमुखी पाठिंबा देऊ केला.पहलगाममध्ये २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला केला गेला. त्याआधी दोन दिवस म्हणजे २० एप्रिलपासून बैसरनचे पठार सुरक्षा यंत्रणेच्या परवानगीविना पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. याची माहिती पहेलगामच्या स्थानिक प्रशासनालाही नव्हती. पहेलगामच्या स्थानिक पर्यटन कंपन्यांनी पर्यटकांना घेऊन जाणे सुरू केले. पण, त्याची माहिती सुरक्षा व्यवस्थांना नव्हती. त्यामुळे बैसरन भागात निमलष्कराची वा पोलिसांची सुरक्षा तैनात केली गेली नाही, अशी माहिती बैठकीमध्ये देण्यात आल्याचे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी सांगितले.

बैसरनमध्ये पर्यटकांचा ओढा लक्षात घेऊन या भागात पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) तैनात केले जाते. मग, यावेळी या यंत्रणा कुठे होत्या, असा प्रश्न लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी उपस्थित केला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या (पान ११ वर)

अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला केंद्रीयगृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्यासह बहुतांश सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांचे सदस्य उपस्थित होते. सुरूवातीला गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी २० मिनिटे घटनेबाबत तपशिलावर माहिती दिली. त्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. गरज पडेल तेव्हा शहा मध्यस्थी करून प्रश्नांना उत्तरे देत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. पाकिस्तानची नाकाबंदी करण्याबाबत उचललेल्या पावलांची माहितीही यावेळी देण्यात आली. त्यानंतर देशाच्या हितासाठी केंद्र सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना सर्व पक्षांचा पाठिंबा असेल असे आश्वासन विरोधी पक्षांनी दिल्याचे तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी सांगितले.

अमरनाथ यात्रेवेळी बैसरनला पर्यटक जातात. त्यामुळे तेथे जूनपासून सुरक्षाव्यवस्था तैनात असते. पण, एप्रिलपासूनच पर्यटक जाऊ लागले होते. हजारो पर्यटक जात असताना याची माहिती ना पोलिसांना होती ना सैन्य दलांना… केंद्रीय राखीव पोलीस दलालाही (सीआरपीएफ) पर्यटक बैसरनला जात असल्याचे कळले नाही. गुप्तहेर संस्थांना देखील माहिती नव्हते, असे बैठकीत सांगण्यात आले.