Padma Awards 2023 : भारत सरकारने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावेळी केंद्र सरकारने एकूण १०६ पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव तसेच ओआरएसचे निर्माते दिलीप महालनाबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
७ जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार
केंद्र सरकारने एकूण १०६ पद्म पुरस्कारांपैकी ६ जणांना पद्मविभूषण, ९ जणांना पद्मभूषण तर ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. यामध्ये १९ मान्यवर महिला आहेत. तर यामध्ये २ एनआरएय, परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
९ जणांना पद्मभूषण, ९१ जणांना पद्मश्री
एकूण ९ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. यामध्ये सुधा मूर्ती, कुमार मंगलम बिर्ला या मान्यवरांचा समावेश आहे. तर ९१ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये आरआरआर चित्रपटाचे संगीतकार कीरावानी, अभिनेत्री रविना टंडन आदींचा समावेश आहे.
महाराष्ट्राचे परशुराम खुने यांना पद्मश्री
औषधनिर्माण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे ओआरएसचे निर्माते दिलीप महालनाबीस यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पद्म पुरस्कार मिळणाऱ्या मान्यवरांमध्ये महाराष्ट्रातील परशुराम कोमाजी खुने यांचा समावेश असून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ते मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. त्यांनी आतापर्यंत ५००० नाटकांच्या प्रयोगांमध्ये ८०० पेक्षा जास्त भूमिका केलेल्या आहेत. तसेच महाराष्ट्रातील प्रभाकर भानुदास मांडे यांना आपल्या साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे तर गजानन माने यांना समाजसेवेमुळे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकतेच निधन झालेले राकेश झुनझुनवाला (महाराष्ट्र,) यांनादेखील मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेले मान्यवर
मुलायमसिंह यादव (मरणोत्तर)
दिलीप महालनाबीस (मरणोत्तर)
झाकीर हुसेन
एसएम कृष्णा
श्रीनिवास वर्धन
बालकृष्ण दोशी