१८ वर्षांवरील सर्वाना थेट केंद्रावर लसलाभ; मोहिमेला बळ

नवी दिल्ली : पुढील आठवडय़ापासून (२१ जून) लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. लसीकरणासाठी ‘कोविन’वर  ऑनलाइन नोंदणीची सक्ती रद्द करण्याचा निर्णय केंद्राने मंगळवारी घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील कोणालाही थेट लसीकरण केंद्रावर जाऊन तिथे नोंदणीनंतर लसलाभ घेता येईल.

देशात लसीकरण संथगतीने सुरू असून, ऑनलाइन नोंदणीच्या सक्तीमुळे ग्रामीण भागांतील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. शिवाय २१ जूनपासून १८-४४ वयोगटासाठीही केंद्रच लसपुरवठा करणार असल्याने लसीकरण मोहीम व्यापक होण्याची आशा आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्राने ‘कोविन’वर ऑनलाइन पूर्वनोंदणीची सक्ती न करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त माध्यमांनी आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने दिले आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील कोणालाही थेट लसीकरण केंद्रावर जाऊन तिथे नोंदणीनंतर लस घेता येणार आहे. ही सुविधा आधी ४५ वर्षांवरील नागरिकांना उपलब्ध होती. ती आता १८-४४ वयोगटासाठीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा १८-४४ वयोगटाला मोठा फटका बसला. सध्या दैनंदिन रुग्णवाढ कमी होत असली तरी देशाच्या विविध भागांतील निर्बंध दूर करून अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी या वयोगटाचे लवकरात लवकर लसीकरण करणे आवश्यक असल्याचे मानले जाते.

कोव्हॅक्सिन फार काळ १५० रुपयांत देणे अशक्य

हैदराबाद : कोव्हॅक्सिन लस फार काळ १५० रुपयांत सरकारला पुरविणे शक्य होणार नाही, असे भारत बायोटेकने मंगळवारी स्पष्ट केले. खुल्या बाजारात किमती अधिक असताना सरकारला इतक्या कमी किमतीत लस पुरविणे अवघड आहे. १५० रुपये ही स्पर्धात्मक किंमत नक्कीच नाही, असे कंपनीने म्हटले आहे. भारत बायोटेक कंपनी केंद्र सरकारला १५० रुपये, तर खासगी रुग्णालयांना १२०० रुपयांना लसमात्रा पुरवते.

लसीकरणामुळे एकाचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात करोना प्रतिबंधक लसीकरणामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची कबुली पहिल्यांदाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अहवालाद्वारे दिली आहे. ही घटना मार्चमधील आहे. मात्र, देशात आतापर्यंत नागरिकांना २६ कोटी लसमात्रा देण्यात आल्या असून, लशींचा दुष्परिणाम नगण्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच्या मृत्यूच्या घटनेमुळे लशींच्या सुरक्षेबाबत शंका निर्माण करू नये व गैरसमज पसरवू नये, असे आवाहन करोना कृतिगटाचे प्रमुख व निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी मंगळवारी केले.

अडीच महिन्यांतील सर्वात मोठी रुग्णघट

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेतील दैनंदिन रुग्णवाढीत ८५ टक्के घट झाली आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये ६० हजार ७४१ रुग्ण आढळले. गेल्या ७५ दिवसांतील ही नीचांकी दैनंदिन रुग्णवाढ आहे. प्रतिदिन १०० पेक्षा जास्त रुग्णवाढ होणाऱ्या जिल्ह्य़ांची संख्याही ५३१ वरून १६५ वर आली आहे.

राज्यात करोनाचे ९३५० नवे रुग्ण

मुंबई : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी करोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या खाली नोंदविण्यात आली. दिवसभरात ९ हजार ३५० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर १५ हजार १७६ रुग्ण करोनामुक्त झाले. गेल्या २४ तासांत ३८८ रुग्णांचा मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्य़ात सर्वाधिक १०२८ रुग्णांची नोंद झाली, सांगलीत ९९९, पुणे ग्रामीणमध्ये ६९८, साताऱ्यात ८०८, रत्नागिरीत ६६२ रुग्णांची नोंद झाली.

डेल्टाविषाणूवर कोव्हिशिल्ड प्रभावी

लंडन : भारतात आढळलेल्या ‘डेल्टा’ या करोना विषाणूवर फायझर आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लशी परिणामकारक असल्याचे नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या लशींच्या दोन मात्रा घेतल्यास ‘डेल्टा’ विषाणूपासून चांगले संरक्षण मिळते, असे ब्रिटनच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात आढळले. अ‍ॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लशीची निर्मिती भारतात कोव्हिशिल्ड नावाने होत आहे. या लशीची ‘डेल्टा’ विषाणूविरोधात ९२ टक्के, तर फायझर/ बायोएनटेकच्या लशीची ९६ टक्के परिणामकारकता आहे.

Story img Loader