भारताचे महालेखापाल (कॅग) विनोद राय यांनी परदेशात यूपीए सरकारवर टीका केल्याप्रकरणी सरकार आणि विरोधकांमध्ये शुक्रवारी शाब्दिक युद्ध झडले. सरकारने राय यांच्यावर टीका केली तर विरोधकांनी राय यांच्या पारडय़ात आपले वजन टाकले.
घटनादत्त जबाबदारी संभाळणाऱ्या महालेखापालांनी परदेशात सरकारवर टीका करून लक्ष्मणरेषेच्या मर्यादेचे उल्लंघन करू नये, असे माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी बजावले. ‘टूजी स्पेक्ट्रम’ संदर्भात १.७६ लाख कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी सत्यता पडताळून न बघता परकीय भूमीवर जाऊन तेथील व्यासपीठावर सरकारवर टीका करण्याचा मार्ग राय यांनी अनुसरला, हे दुर्दैवी आहे, अशी टीका तिवारी यांनी केली. हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये भाषण करताना महालेखापालांचे अधिकार कमी करून सरकार आपल्याला एखाद्या लेखापालाप्रमाणे (अकाऊण्टण्ट) वागविण्याचा प्रयत्न करते, अशी टीका राय यांनी केली होती. आम्ही संसदेत केवळ आपला अहवाल सादर करावा एवढीच आमची भूमिका मर्यादित आहे की आमच्या निष्कर्षांवर विशेषत: आरोग्य, शिक्षण, जलप्रदूषण, पर्यावरण यांसारख्या संवेदनशील मुद्दय़ांवर नागरिकांचे मत आजमावावे हेही अपेक्षित आहे, अशीही विचारणा राय यांनी केली होती. त्यावर  प्रतिक्रिया विचारली असता तिवारी यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.
दरम्यान, भाजपसह अन्य विरोधी पक्षांनी राय यांना पाठिंबा देत काँग्रेस पक्ष आपले स्वार्थी राजकीय हेतूंसाठी ‘कॅग’ या घटनात्मक संस्थेचा गैरवापर करीत असल्याची आणि ‘कॅग’वर दबाव आणत असल्याची टीका भाजपाने केली.