केंद्रापाठोपाठ भाजपशासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केल्यावर महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकारने इंधनावरील कर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. काही राज्यातींल लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा दणका बसला. त्यामुळेच इंधन दर कमी के ल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याबाबात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

 “संपूर्ण विश्वावर करोनाचे संकट आले त्यामुळे प्रत्येकाला काही पथ्ये पाळावी लागत आहेत. करोनाचे संकट कमी होत आहे. राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतल्याने करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. लोकांकडून मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगसारखे करोनाचे नियम पाळण्याची तयारी असल्याचे सरकारला सांगितले,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवारांना करोनाची लक्षणे जाणवल्याने आज त्यांची चाचणी घेण्यात आली आहे. अजित पवारांच्या घरातील कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना रिस्क नको म्हणून यायला नाही सांगितलं आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत याबाबत राज्यातील लोकांना काही दिलासा मिळू शकतो का असा प्रश्न विचारल्यावर शरद पवारांनी त्यावर भाष्य केले आहे. “राज्य सरकारने निश्चित दिलासा देऊ असे म्हटले आहे. पण केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे देणं आहे ते लवकर द्यावे म्हणजे लोकांना अशा प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेता येईल,” असे शरद पवार म्हणाले.

“एसटी संघटनेतील व्यक्ती मला भेटले होते. त्यांनी हा संप पुढे न्यायचा नाही हे सांगितले होते. दिवाळीच्या काळात नागरिकांना त्रास देणे योग्य नाही अशी आमची भूमिका आहे. काही लोकांनी टोकाची भूमिका घेतली आहे म्हणून हे घडत आहे. ८० ते ८५ टक्के एसटी रस्त्यावर धावत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना माझे आवाहन आहे की संस्थेच्या हितासाठी आणि नागरिकांच्या सुविधेसाठी हे योग्य होणार नाही. कोर्टाने सुद्धा हा संप कायदेशीर नाही अशा प्रकारच्या निष्कर्षाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोर्टाचा आदर ठेवावा आणि हा विषय संपवावा,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

दिवाळीच्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे बारामतीमध्ये पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. शरद पवार यांच्या बारामती येथील माळेगाव येथील आप्पासाहेब पवार सभागृहात दिवाळी भेट कार्यक्रमास कार्यकर्त्यांची मोठी झुंबड उडाली होती. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमास उपस्थित नव्हते.

Story img Loader