केंद्र सरकारने कथित मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर (IRF) दहशतवादाला खतपाणी घालण्याचा आरोप करत मोठा निर्णय घेतलाय. गृह मंत्रालयाने मलेशियातून काम करणाऱ्या आणि सध्या जगभरात नेटवर्क असलेल्या या संघटनेवर ५ वर्षांची बंदी घातली आहे. या संघटनेचा प्रमुख झाकीर नाईकवर धार्मिक धृवीकरणासाठी चिथावणीखोर भाषणं करणं आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचा आरोप आहे. बेकायदेशी कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (UAPA) बंदी घातलेली ही पहिली संघटना ठरली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने आपल्या या निर्णयाची माहिती देताना सांगितलं, “आयआरएफ देशाच्या सुरक्षेला बाधा पोहचेल अशा कृतींमध्ये सहभागी आहे. ही संघटना देशातील शांतता, धार्मिक सौहार्द बिघडवू शकते. तसेच देशाच्या धर्मनिरपेक्ष धाग्यांना धक्का लावू शकते. आयआरएफचा संस्थापक आणि प्रमुख झाकीर नाईक आणि या संघटनेचे सदस्य त्यांच्या अनुयायांना धर्माच्या आधारावर चिथावणी देत आहेत. तसेच द्वेश पसरवून शत्रुत्वाची भावना निर्माण करत आहेत. यातून देशाच्या एकतेला बाधा पोहचत आहे.”

“झाकीर नाईकची भाषणं आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर”

“झाकीर नाईकची भाषणं आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर आहेत. यातून तो भारतातील विशिष्ट भागात धार्मिक द्वेष वाढवून तरुणांना दहशतवादी कृत्यात सहभागी होण्यास प्रोत्साहन देतो. आता या संघटनेवर बंदी घातली नाही तर ते आपल्या समर्थकांना एकत्र करून विध्वंसक कृत्यांमध्ये सहभागी होतील. यामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण होईल. त्यामुळे यूएपीए अंतर्गत ५ वर्षांच्या बंदीचा निर्णय घेण्यात आलाय,” असंही गृहमंत्रालयाने नमूद केलं.

हेही वाचा : पाकिस्तानात महिला शिक्षकांना तालिबानी जाच; कपड्यांवर निर्बंध

झाकीर नाईक मलेशियातून इंटरनेट सॅटेलाईट टीव्हीचा वापर करून जगभरातील आपल्या अनुयायांशी संवाद साधतो. याशिवाय सोशल मीडिया, मुद्रित साहित्य याचाही प्रचारासाठी वापर करतो.

Story img Loader