सत्तेत आल्यापासून भाजपने विरोधी पक्षांना लक्ष्य करण्याची रणनीती अवलंबिली आहे. सुरूवातीला काँग्रेस पक्षाला लक्ष्य केल्यानंतर आता केंद्र सरकार विरोधकमुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करत असल्याची टीका काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केली. ते शनिवारी नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. ज्या काँग्रेस पक्षाने इंग्रजांच्या दबावाल जुमानले नाही तो काँग्रेस पक्ष केंद्राच्या दबावाला बळी पडणार नाही. काँग्रेसने शक्तीशाली अशा इंग्रजी राजवटीविरुद्ध लढून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याचप्रमाणे आम्ही मोदी सरकारविरोधातील लढा संसदेतून रस्त्यावर आणू , असा इशाराही यावेळी गुलाम नबी आझाद यांनी दिला.
मोदी सरकार सातत्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करत आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना न्यायालयात खेचणे हा त्याच रणनीतीचा एक भाग आहे. सुब्रह्मण्यम स्वामी गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस नेतृत्वाविरोधात काम करत आहेत. केंद्रात सत्तेत आल्यापासून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या सगळ्याला पाठबळ देण्यात आले. नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेतृत्त्वाला लक्ष्य करण्यामध्ये भाजप आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग आहे. त्यामुळेच सोनिया आणि राहुल यांना न्यायालयामध्ये हजर राहण्यास भाग पाडण्यात यशस्वी झाल्यामुळे सुब्रह्मण्यम स्वामी यांना केंद्राकडून सरकारी घर आणि झेड दर्जाच्या सुरक्षा बक्षीस म्हणून देण्यात आल्याचा आरोप यावेळी आझाद यांनी केला.
नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी आज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर राहणार आहेत. या पार्श्वभूमवीर काँग्रेसकडून दिल्लीत केंद्र सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन करण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Story img Loader