पावसाने दडी मारल्याने देशात दुष्काळसदृश स्थिती ओढवण्याची शक्यता गृहीत धरून केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठय़ाबाबत आपत्कालीन योजना तयार करण्यास सांगितले आहे. अपुऱ्या पावसामुळे देशाच्या अनेक भागांत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे वृत्त हाती आल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारांना सदर आदेश दिले आहेत.
हवामानाची माहिती देणाऱ्या एका खासगी संस्थेच्या अहवालानुसार, देशात सध्या जून महिन्याच्या सरासरीच्या ४२ टक्के पाऊस कमी झाला आहे. गेल्या ११३ वर्षांत १२ वेळा अशी परिस्थिती ओढवली आहे. गुजरात आणि राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये ८० टक्क्यांपेक्षाही कमी पावसाची नोंद झाली आहे. विविध राज्यांमधील पाणीपुरवठय़ाच्या परिस्थितीवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. आता देशातील प्रत्येक राज्य त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्य़ातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठय़ाबाबतच्या आपत्कालीन योजनेची माहिती संबंधित मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देणे बंधनकारक करण्यात आले आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.

Story img Loader