भूकंपानंतर गेल्या शनिवारपासून नेपाळच्या वेगवेगळ्या भागात अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. उत्तर प्रदेश परिवहन विभागाच्या ३६ बसेस भारतीय प्रवाशांना घेऊन काठमांडूहून रवाना झाल्या असल्याची माहिती परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. प्रत्येक बसमध्ये ५५ प्रवासी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व बसेस प्रवाशांना घेऊन गोरखपूरमध्ये येणार आहेत.
Thirty six buses of UPSRTC left Kathmandu for Gorakhpur today so far. Each bus has taken about 55 persons. #NepalEarthquake
— Vikas Swarup (@MEAIndia) April 28, 2015
नेपाळमध्ये गेल्या शनिवारी अधिक तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर तेथील भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या. सुरुवातीच्या टप्प्यात हवाई मार्गाने काही नागरिकांना परत आणण्यात आले. मात्र, आता रस्त्यानेही नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारच्या साह्याने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेश परिवहन विभागाच्या बसेस भारतीय प्रवाशांना घेऊन परतत आहेत.
दरम्यान, नेपाळमधील भूकंपग्रस्त नागरिकांना मदतीसाठी केंद्र सरकारकडून मंगळवारी आठ टन दूध आणि लहान मुलांसाठीचे खाद्यपदार्थ, सहा टन औषधे आणि दोन टन बिस्किटे हवाई मार्गाने काठमांडूकडे रवाना करण्यात आली. नेपाळी नागरिकांसाठी ५५ टन पिण्याचे पाणीही पाठविण्यात आले असल्याचे विकास स्वरूप यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.