केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी बारामुल्ला जिल्ह्यातील एका सभेला संबोधित केलं. दरम्यान, भाषण सुरु असतानाच जवळच्या मशिदीत अजान सुरु झाल्याने अमित शाह यांनी काही वेळासाठी आपलं भाषण थांबवलं. यानंतर उपस्थितांनीही अमित शाह यांचं टाळ्या वाजवून कौतुक केलं. अमित शाह यांच्या सभेतील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
बारामुल्ला जिल्ह्यातील शौकत अली स्टेडियममध्ये अमित शाह यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर काही वेळातच मशिदीतून आवाज येऊ लागला. अमित शाह यांनी मंचावर उपस्थित नेत्यांना “मशिदीत काही सुरु आहे का?” अशी विचारणा केली. त्यावर त्यांना अजान सुरु असल्याचं सांगण्यात आलं. यानंतर अमित शाह यांनी आपलं भाषण थांबवलं.
अजान संपल्यानंतर त्यांनी लोकांना भाषण पुन्हा सुरु का? असं विचारलं. ते म्हणाले “जवळच्या मशिदीमध्ये प्रार्थना सुरु होणार असल्याचं मला एका चिठ्ठीद्वारे समजलं. आता प्रार्थना संपली आहे. पुन्हा भाषण सुरु करतो. चालेल ना?”. यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्यांचं कौतुक केलं. दरम्यान, भाषणाला सुरुवात करण्याआधी त्यांनी तासाभरापासून जास्त वेळ वाट पाहणाऱ्या लोकांचे आभार मानले.
“पाकिस्तानशी चर्चा करणार नाही”
“काही लोक मला पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला देत आहेत. पण मी त्यांच्याशी चर्चा करु इच्छित नाही. मात्र जम्मू-काश्मीरच्या जनतेशी मला बोलायचे आहे. मोदी सरकार हे दहशतवाद सहन करत नाही, तो नष्ट करते. जम्मू-काश्मीर हा देशातील सर्वात शांत प्रदेश व्हावा, यासाठी आम्ही काम करत आहोत,’’ असे शाह म्हणाले.
“पारदर्शक पद्धतीने निवडणुका होणार”
निवडणूक आयोगाने अंतिम मतदारयादी तयार केल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि या निवडणुका संपूर्णत: पारदर्शक पद्धतीने पार पाडल्या जातील अशी हमीदेखील अमित शाह यांनी दिली.