Bomb Threats Indian flights CIA finds IP Address from London & Germany : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अनेक धमक्या अथवा अफवा समोर आल्या आहेत. यामुळे विमान कंपन्या व त्या-त्या विमानतळ प्रशासनांची पाचावर धारण बसते. त्यांना पुन्हा तपास करावा लागतो, बॉम्ब शोधणाऱ्या पथकाला पाचारण करावं लागतं, विमानतळावरील व्यवस्थापनात बदल करावा लागतो. यात वेळ आणि अमाप पैसे खर्च होतात, मात्र हाती काहीच लागत नाही. या धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांत बॉम्बने विमान उडवून देण्याच्या जवळपास २० हून अधिक धमक्या आल्या आहेत. या अशा प्रकराच्या घटनांची केंद्र सरकारने आता गंभीर दखल घेतली आहे. २० विमानं बॉम्बने उडवण्याच्या धमक्या आल्या असून त्यात आंतरराष्ट्रीय विमानांचा देखील समावेश आहे. यापैकी अनेक विमानांचे मार्ग देखील बदलावे लागले. मात्र, सर्व धमक्या खोट्या ठरल्या आहेत.

दरम्यान, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास केला असून समाजमाध्यमांवर अशा धमक्या ज्या आयपी अ‍ॅड्रेसवरून (Internet Protocol address) आल्या आहेत ते आयपी अ‍ॅड्रेस शोधून काढले आहेत. हे आयपी अ‍ॅड्रेस लंडन व जर्मनीमधील असल्याचं गुप्तचर यंत्रणांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा >> बहराइच हिंसाचार : गोपाल मिश्रा हत्या प्रकरणातील आरोपींवर पोलिसांचा गोळीबार; नेपाळ सीमेवर झालेल्या चकमकीत दोघे जखमी

केंद्रीय तपास यंत्रणा धमक्या देणाऱ्यांच्या मागावर

इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार सोमवारी तीन आंतरराष्ट्रीय विमानं बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या, तर मंगळवारा १० विमानांना अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या. तर, बुधवारी अशा सहा घटना समोर आल्या. सर्व धमक्या समाजमाध्यमांवरील वेगवेगळ्या अकाउंट्सवरून देण्यात आल्या होत्या. हे सर्व अकाउंट्स बनावट असल्याचं समोर आलं आहे. या धमक्यांसाठी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर केला गेला आहे. त्यानंतर, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी एक्सकडून त्या अकाउंट्सचा आयपी अ‍ॅड्रेस मागितला. तसेच हे अकाउंट्स बंद करण्याची विनंती करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> Ghaziabad Maid: “..म्हणून जेवणात लघवी मिसळली”, किळसवाण्या प्रकारानंतर मोलकरणीनं सांगितली धक्कादायक माहिती

दरम्यान, इंडियन एक्सप्रेसला सुत्रांनी सांगितलं, याबाबतचा प्रारंभिक अहवाल आम्हाला मिळाला आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की या पोस्ट तीन वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून करण्यात आल्या आहेत. यापैकी दोन अकाउंट्सचे आयपी अ‍ॅड्रेस लंडन आणि जर्मनीमधील आहेत. या युजर्सनी पोस्ट करण्यासाठी विशिष्ठ व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा (VPN) वापर केला आहे. जेणेकरून ते त्यांची ऑनलाइन ओळख लपवू शकतील. तसेच तिसऱ्या अकाउंटची माहिती अद्याप मिळालेली नाही. आम्ही अधिक माहितीच्या प्रतीक्षेत आहे.