कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांदरम्यान झालेला हिंसाचार बघता केंद्राचा हस्तक्षेप आवश्यक असून अनुच्छेद ३५५ लागू करण्यासारखी स्थिती असल्याचा दावा भाजपचा सत्यशोधन समितीने केला आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुन्हेगारांवर कारवाईसाठी पोलिसांना मुक्तहस्त दिल्याचे जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच पार पडलेल्या पंचायत निवडणुकांदरम्यान पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला. त्यानंतर भाजपने माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय सत्यशोधन समिती गठित केली होती. या समितीने आपले निष्कर्ष मांडताना ममता बॅनर्जी यांनी अराजक आणि बेकायदा कारभाराचा डाव्यांच्या सरकारचा विक्रमही मोडला आहे, असा आरोप प्रसाद यांनी केला. राज्यात होत असलेला हिंसाचार आणि हत्या याला संपूर्णत: राज्य सरकार जबाबदार असल्याचेही ते म्हणाले. हिंसाचारावर काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे केंद्रीय नेतृत्व मौन का बाळगून आहे, असा सवालही प्रसाद यांनी केला.

उच्च न्यायालयाच्या आदेशावरच निवडणुकीचे निकाल अवलंबून

पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुका आणि निकाल जाहीर करणे हे आमच्या अंतिम आदेशांच्या अधीन असेल, असे कलकत्ता उच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले. मतदानाच्या दिवशी निवडणूक गैरप्रकारांच्या आरोपांबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग, राज्य सरकार आणि केंद्र सरकारला गैरप्रकाराचा आरोप करणाऱ्या तीन याचिकांमध्ये केलेल्या सर्व आरोपांबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. ८ जुलै रोजी झालेल्या पंचायत निवडणुकीदरम्यान मोठय़ा प्रमाणात हिंसाचार आणि निवडणूक गैरप्रकार झाल्याचा आरोप करत सुमारे ५० हजार बूथवर फेरमतदान घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला द्यावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.

तृणमूल काँग्रेसला घवघवीत यश, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालामध्ये तृणमूल काँग्रेसने निर्विवाद आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसने ३४ हजार ९०१ जागा जिंकल्या आणि ते ६१३ जागांवर आघाडी घेतली आहे. प्रमुख विरोधी पक्ष भाजप दुसऱ्या स्थानावर आहे. एकेकाळी राज्यावर दीर्घकाळ सत्ता गाजवलेल्या माकप तिसऱ्या तर काँग्रेस चौथ्या स्थानावर आहे. भाजपला ९ हजार ७१९ जागा मिळाल्या असून ते १५१ जागांवर आघाडीवर आहेत.

हिंसाचारामध्ये झालेल्या मृत्यूंमुळे मी व्यथित झाले आहे. १९ मृतांमध्ये बहुतांश तृणमूलचेच कार्यकर्ते आहेत. हिंसाचार घडविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मी पोलिसांना पूर्ण मोकळीक दिली आहे. – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल