मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. ज्यामध्ये फग्गन सिंह काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस नेत्यांना शिवीगाळ करताना दिसत आहेत. काँग्रेसबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी कॅमेऱ्यासमोरच शिवीगाळ केली.
ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी यावर आक्षेप घेतला असून केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांचा निषेध केला आहे. तर केंद्रीय मंत्री हे अनौपचारिक संभाषण होतं, असं म्हटलं.
फग्गन सिंह कुलस्ते हे मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असून ते मंडलाचे खासदार आहेत. एका सभेच्या ठिकाणी काँग्रेसबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी काँग्रेस पक्ष आणि आमदारांना शिवीगाळ केली. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या १५ महिन्यांच्या कार्यकाळात जनतेला पाणीही दिलं नाही, असं म्हणत त्यांनी ही शिवीगाळ केली.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यांनी कुलस्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्र्याच्या या कृत्याचा सोशल मीडियावर अनेकांनी निषेध केला आहे.